मालेगाव – प्रत्यक्षात काम न करता पैसे लाटल्याचा ठपका ठेवत मालेगाव महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, संबंधित ठेकेदार व त्रयस्त मूल्यमापन करणाऱ्या तंत्रनिकेन महाविद्यालयाचे विभाग प्रमुख अशा एकूण १५ जणांविरुद्ध नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बारा वर्षे जुन्या असलेल्या या प्रकरणातील संशयितांमध्ये तत्कालीन उपायुक्त, तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक, विद्यमान शहर अभियंता यांचा समावेश आहे.
महाविद्यालय ते सोयगाव या रस्त्यावरील गटाराचे काम न करता पैसे लाटल्याची तक्रार करण्यात आली होती. काही महिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे या तक्रारीची चौकशी सुरू होती. या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी या संदर्भात तक्रार दिली. संशयितांमध्ये महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव, तत्कालीन कनिष्ठ अभियंता मुरलीधर देवरे (सेवानिवृत्त), तत्कालीन उपअभियंता संजय जाधव (सेवानिवृत्त) तत्कालीन कनिष्ठ अभियंता राजेंद्र बाविस्कर (सेवानिवृत्त), मक्तेदार सोहेल अब्दुल रहेमान, केबीएच तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विभाग प्रमुख दिनेश जगताप, तत्कालीन कनिष्ठ लिपिक नीलेश जाधव, केदा भामरे, मधुकर चौधरी, सुनील खडके (सेवानिवृत्त), सुहास कुलकर्णी(सेवानिवृत्त), तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक उत्तम कावडे (सेवानिवृत्त), तत्कालीन लेखापरीक्षक अशोक म्हसदे (सेवानिवृत्त), तत्कालीन लेखाधिकारी कमरुद्दीन शेख(सेवानिवृत्त), तत्कालीन उपायुक्त कृष्णा वळवी (मयत) यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन
संशयितांनी पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करत ठेकेदाराने केलेल्या कामाचे योग्य मूल्यमापन न करता देयक अदा केले. महापालिका आणि शासन निधीतील २० लाख ६८ हजार ६०७ रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्वांविरुद्ध १९८८ चे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी या प्रकरणाचा तपास केला.