जळगाव : बाहेरगावी राहणाऱ्या जागामालकांना हेरून त्यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड बनवीत मूळ मालकाच्या जागी बनावट व्यक्ती उभी करीत कमी मूल्य घेत भूखंड विकणाऱ्या टोळीचे जाळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. तिघांना शहर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील अयोध्यानगर भागात तीन खुले भूखंड अनिता  नेहते यांच्या नावावर आहेत. सध्या त्या कामानिमित्त नाशिक येथे राहतात. त्यांच्याऐवजी बनावट महिला उभी करीत त्यांच्या नावे असलेल्या दोन कोटी किमतीचे तीन खुले भूखंड विकण्याच्या प्रयत्नात असताना तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाळ्यात अडकविले. नेहते यांचे हे सुमारे दोन कोटींचे खुले भूखंड  राजू बोबडे, प्रमोद  पाटील व गंगा जाधव हे तिघे कमी पैसे घेऊन ज्या व्यक्तीच्या नावावर आहेत, त्यांचे बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड बनवीत विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली.

त्याअनुषंगाने हवालदार विजयसिंह पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी यांचे पथक नियुक्त केले. पथकाला तिघे संशयित आॅटोनगरातील हाॅटेल संदीपजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तेथे धाव घेत संशयित राजू बोबडे (वय ४२, रा. विठ्ठल-रुख्माई मंदिर, विटनेर), प्रमोद  पाटील (वय ४६, रा. विरावली, ता. यावल) व गंगा  जाधव (वय ४२, रा. अयोध्यानगर, जळगाव) यांना ताब्यात घेतले. यातील  बोबडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, रामनंदनगर व शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang was arrested for selling plots by setting up fake owners ysh
First published on: 03-02-2023 at 11:20 IST