भरड धान्य प्रोत्साहन उपक्रमांतर्गत कार्यक्रम; ५०० नागली उत्पादक
नाशिक : आदिवासी विकास विभाग आणि ‘प्रगती अभियान’ यांच्यावतीने भरड धान्य प्रोत्साहन उपक्रमांतर्गत सुधारित पद्धतींचा अवलंब करून नागली उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष येथे उत्साहात पार पडला. यात सुमारे ५०० नागली उत्पादक सहभागी झाले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यकारी संचालक अश्विनी कुलकर्णी तर, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती गणपत वाघ, कृषी सहाय्यक सुवर्णा कोल्हे उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रगती अभियान आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच आहारात त्याचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी करीत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. अभियानच्या कुलकर्णी यांनी आदिवासी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची गरज व महत्व अधोरेखीत केले.
नागली हे पीक आदिवासी जीवनशैलीचा भाग आहे. पण, पीक घेण्याचे कष्ट, किडीचा वाढता प्रादुर्भाव, घटते उत्पादन यामुळे आदिवासींनी नागली घेणे कमी केले. हे कसदार भरड धान्य त्यांच्या आहारातून कमी होऊ लागले. हे थोपवण्यासाठी आणि सेंद्रिय पद्धतीने नागलीचे उत्पादन वाढविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांसोबत २०१८ पासून काम सुरू केले. तीन वर्षांत या उपक्रमाने यशस्वी आगेकूच केली, त्याचे अनुभव उत्पादकांनी मेळाव्यात मांडले.
सुधारीत पध्दतीने नागली उत्पादन वाढीच्या या प्रकल्पात गादी वाफा बनविणे, चारसूत्री पध्दतीने पुनर्लागवड, रोग आणि कीड नियंत्रण तसेच घरच्या घरी सेंद्रिय खत बनविणे आणि त्याचा वापर यासाठी संस्थेचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. यामध्ये काही महिला शेतकरी तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी नागलीच्या विविध पाककृतीची माहिती दिली. माजी सभापती वाघ यांनी स्थानिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात नागलीचे उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. कृषी सहाय्यक कोल्हे यांनी उत्पादन वाढीच्या या उपक्रमास कृषी विभागाच्या विविध योजनाची जोड दिली तर शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मेळाव्यात पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, शहापूर व मोखाडा या भागातील नागली उत्पादक शेतकरी व महिला बचत गटाच्या सदस्य सहभागी झाले होते.



