नाशिक – जिल्ह्यातील १११ द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या संशयित महिलेस दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. परदेशातील द्राक्ष निर्यातीत फसवणूक झाल्याची तक्रार दिंडोरी येथील दशरथ जाधव यांनी केल्यानंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
हेही वाचा – बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून कालापव्यय, जिल्ह्यातील अनेक जागांवर घोळ कायम
जाधव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांची ५४ लाख, ८५ हजार १५० रुपयांना आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. संशयित व्यापारी महिलेच नाव पूर्वा चव्हाण असून ती उच्चशिक्षीत आहे. गुन्हा घडल्यापासून पूर्वा फरार होती. तिच्यावर जिल्ह्यातील वणी, वडनेर भैरव, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पूर्वाच्या शोधासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक विक्रम देशमानेंसह अन्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरु, पुणे, ठाणे, तामिळनाडू आदी ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. संशयित पूर्वा चव्हाणला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांनी आमिषांना बळी पडू नये तसेच द्राक्ष मालाबाबत फसवणूक झाल्यास संबंधितांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.