धुळे : वाहन विक्री, खरेदी किंवा दुसऱ्या राज्यात वाहन नेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) व आधार कार्डावरील नावात अगदी किरकोळ फरक आढळल्यास वाहन हस्तांतरण (मालकी बदल) आणि ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळविण्याची ऑनलाइन प्रक्रिया थेट बंद पडू शकते. त्यामुळे हजारो वाहनधारकांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांना तातडीने नोंदी पडताळून आवश्यक दुरुस्त्या करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या चार मे २०२६ रोजीच्या निर्देशानुसार देशभरात वाहन हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र या सेवा आधार प्रमाणीकरणाच्या माध्यमातून पूर्णपणे संपर्कविरहित आणि ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत ई-केवायसीद्वारे आधार पडताळणी केली जाते. मात्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नाव आणि आधार कार्डावरील नाव अक्षरशः जुळणे ही अट अनिवार्य करण्यात आली आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नावात स्पेलिंगमधील बदल, आद्याक्षरांचा फरक, लग्नानंतर बदललेले आडनाव किंवा नावाच्या क्रमातील बदल यामुळेही आधार प्रमाणीकरण अयशस्वी ठरू शकते. अशा परिस्थितीत वाहन हस्तांतरण अथवा ना हरकत प्रमाणपत्रासाठी केलेला ऑनलाइन अर्ज पूर्ण होणार नाही. अनेक वाहनधारकांनी अनेक वर्षांपूर्वी वाहन नोंदणी केली असून, त्यानंतर आधार कार्डावरील नावात किंवा इतर तपशीलांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे अशा वाहनधारकांनी सर्वप्रथम आधार कार्डावरील नाव आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नावाची पडताळणी करावी. दोन्ही नोंदींमध्ये तफावत असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी. त्यानंतरच आधार प्रमाणीकरण करून ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल.

परिवहन विभागाने वाहन प्रणालीमध्ये नोंद असलेले नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवण्याचेही आवाहन केले आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास भविष्यात वाहन विक्री, मालकी बदल, बँकेचे कर्ज हस्तांतरण, विमा प्रक्रिया किंवा दुसऱ्या राज्यात वाहन नेण्यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळविताना विलंब किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाहनधारकांनी कोणतीही वेळ न दवडता आपल्या आरसीवरील माहिती, आधार कार्डावरील नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात. अन्यथा गरजेच्या वेळी वाहन हस्तांतरण किंवा ना हरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया अडकण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा स्पष्ट इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी दिला आहे.

परिवहन विभागाच्या मते, ऑनलाइन आणि संपर्कविरहित सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आपल्या वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक बदल त्वरित करून घ्यावेत. विशेषतः वाहन विक्री, वारसाहक्काने मालकी हस्तांतरण, कर्जमुक्तीनंतर मालकीतील बदल किंवा दुसऱ्या राज्यात वाहन हलविण्याची शक्यता असलेल्या वाहनधारकांनी ही प्रक्रिया आधीच पूर्ण केल्यास भविष्यातील अनावश्यक अडचणी, विलंब आणि कार्यालयीन फेऱ्या टाळता येतील, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी स्पष्ट केले आहे.