मागील कित्येक महिन्यांपासून आधार कार्ड नोंदणी बंद असल्याने विद्यार्थी व पालकांची सुरू असलेली वणवण यावर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर महाऑनलाइनमार्फत ही सेवा कार्यान्वित करण्याची धडपड गुरुवारीही सुरू होती. पहिल्या टप्प्यात तातडीने २० उपकरणे कार्यान्वित केले जात असून उर्वरित १२० उपकरणे पुढील दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील उपकरणे शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहेत.

सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्याची सक्ती केली जात आहे. शहर व ग्रामीण भागात केंद्र अस्तित्वात नसल्याने पालकांना त्यांचे आधार कुठे काढावे, हा प्रश्न भेडसावत होता. आधार कार्ड नोंदणीचे काम ज्या संस्थेला दिले गेले, तिचा करार संपुष्टात आल्यामुळे नोंदणीची प्रक्रिया बंद पडली. परिणामी, नव्या शैक्षणिक वर्षांत पालक व विद्यार्थ्यांच्या मनस्तापात अधिक भर पडली.

शासनाने नियुक्त केलेली एजन्सी आणि केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाने खासगी एजन्सीला दिलेली केंद्रे या ठिकाणी आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू होते. खासगी केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने आणि त्याबद्दल फारशी माहिती नसल्याने नागरिकांसह पालकांची अडचण झाली. आधार नोंदणी करणाऱ्या एजन्सीशी असणारा करार जूनमध्ये संपुष्टात आला. त्यामुळे नोंदणीची जबाबदारी महाऑनलाइनकडे सोपविण्यात आली. त्यांच्यामार्फत नव्याने एजन्सी नियुक्त करून आधार नोंदणीचे काम सुरू केले जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडील १४० आधार नोंदणीची उपकरणे महा ऑनलाइनला देण्यात आली. ही उपकरणे संबधितांकडून नव्याने कार्यान्वित केली जात आहे. पहिल्या टप्प्यात कार्यान्वित होणाऱ्या २० उपकरणाचे काम शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे महा इ सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात आले.

पहिल्या टप्प्यात कार्यान्वित होणाऱ्या महा ई सेवा केंद्रांची यादी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

आधार नोंदणी इथे करा

पंचवटीतील दुर्गा नगर येथे तीन केंद्र, पंडित कॉलनी येथे एक, सातपूर व ध्रुवनगर येथे प्रत्येकी दोन, चेहेडी परिसरात जकात नाक्याजवळ तीन, मातोरी आणि येवल्यातील काळा मारुती रस्त्यावर प्रत्येकी दोन, पुरणगाव, पाटोदा, विखरणी व निमगाव या ठिकाणी प्रत्येकी एक केंद्र कार्यान्वित होत आहे. नवीन आधार कार्ड नोंदणी करताना पैसे देण्याची गरज नाही. पुढील काही दिवसांत उर्वरित १२० उपकरणे वेगवेगळ्या महा ई सेवा केंद्रावर कार्यान्वित होणार आहेत.