scorecardresearch

धार्मिक प्रभावामुळे माणसाचे मन, बुद्धी कुंठीत – अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांचे प्रतिपादन

शनिवारी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार तथा ज्येष्ठ लेखक हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले.

धार्मिक प्रभावामुळे माणसाचे मन, बुद्धी कुंठीत – अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांचे प्रतिपादन
अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन (image – लोकसत्ता टीम)

नाशिक – व्यक्ती आणि समाज यावर धार्मिक परंपरांचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे माणसाचे मन आणि बुद्धी कुंठीत झाली आहे. यामुळे ते समाज शोषणाचे बळी ठरतात. यातून मुक्तीसाठी ते प्रयत्न करत नाही. परंतु, काळाच्या ओघात हे चित्र बदलत आहे, असे मत येथे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.

शनिवारी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार तथा ज्येष्ठ लेखक हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हेही उपस्थित होते. यावेळी संमेलनाध्यक्ष मुकादम यांनी साहित्य लेखनाची गरज, त्याचे विविध प्रकार याविषयी सातत्याने चर्चा होत असल्याचे सांगितले. माध्यमांशिवाय आत्मविष्कार होऊ शकत नाही, प्रत्येक कला प्रकाराला स्वतंत्र असे माध्यम आहे. सामाजिक विषयांवर निर्माण होणारे साहित्य ही नाण्याची दुसरी बाजू आहे. राज्यात अनेक मुस्लीम लेखकांनी मराठीतून लेखन केले आहे. मुस्लीम साहित्य संमेलन हे त्याचे पुढचे पाऊल आहे. याविषयी मुक्त चर्चा होत असेल तर ते प्रगतीसाठी योग्य आहे. या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित होत असतील तर त्याचाही विचार केला जाईल, असे मुकादम यांनी नमूद केले.

हेही वाचा –

हेही वाचा –

पूर्व नियोजित वेळेपेक्षा संमेलन तीन तास उशीराने सुरू झाले. यामुळे संमेलनाचे नियोजन विस्कळीत झाले. परिसंवाद, मुशायरा या कार्यक्रमांना कात्री लावण्याची वेळ आयोजकांवर आली. उत्तम कांबळे यांनी समाजीतल कोणतीच व्यवस्था प्रामाणिक राहिलेली नसून ती कशाला तरी बांधील झाली असल्याचे सांगितले. साहित्यिकांना समाजातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संमेलनासारखे सोहळे करावे लागतात. असे मेळावे उपयोगाचे नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून कोणताच विचार समोर येत नाही. शासनाने अनुदान देणे बंद करायला हवे, असे कांबळे यांनी नमूद केले. सध्या समाजात धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ झाल्याने समाज एका वेगळ्या कोंडीत सापडला असल्याचेही त्यांनी सांगितले.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी परिसरातून दिंडी काढण्यात आली. यावेळी इकरा अरबी मदरसा इंग्लिश स्कूलच्या वतीने दिंडीत पथनाट्य सादर करण्यात आले.

तीन टक्केवाल्या साहित्यिकांनी शिकवू नये – दलवाई

संमेलनाचे उद्घाटक माजी खासदार तथा ज्येष्ठ लेखक हुसेन दलवाई यांनी प्रस्थापितांची प्रमाण भाषा गुंडाळून बोलीभाषेतून साहित्य निर्मिती होणे, याची मुस्लीम समाजातील साहित्यिकांनी नोंद घ्यावी, असे सांगितले. अजूनही मुस्लिमांमध्ये मराठी साहित्यात भर घालण्याची वृत्ती वाढलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुस्लिमांनी आपले अनुभव शब्दबद्ध केल्यास मराठी साहित्य सकस होऊ शकेल. वास्तविक मुस्लिमांमध्ये साहित्यापेक्षा पोटाचा विचार आधी आल्याने ते व्यावसायिक क्षेत्रात पुढे आहेत. साहित्य आणि ज्ञानाच्या अभावामुळे सध्या समाजातील प्रस्थापित मुस्लिमांना आपल्या बोटावर नाचविण्याचे काम होत आहे. कोणी कोणती टोपी घालावी, दाढी राखावी वा अन्य काही हे तीन टक्केवाल्या साहित्यिकांनी सांगण्याची गरज नाही. मुस्लिमांना धर्मापासून वंचित करण्याचे प्रयत्न होत असताना शासन आणि समाज दुर्लक्ष करत असल्याचे दलवाई यांनी नमूद केले. मुस्लिमांचे प्रश्न धर्माचे नव्हे तर, जगण्याचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 22:12 IST