scorecardresearch

वीज थकबाकीदारांना ‘अभय’; योजनेतून दीड लाख वीज ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीचा भरणा करून दंडात सवलत देण्यासाठी जाहीर झालेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या एक लाख ४२ हजार २२८ ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.

नाशिक : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीचा भरणा करून दंडात सवलत देण्यासाठी जाहीर झालेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या एक लाख ४२ हजार २२८ ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. त्यांच्याकडे ८५ कोटी ३८ लाखांची मूळ थकबाकी असून त्यावरील व्याज आणि दंड रकमेत ११ कोटी ९२ लाख रुपयांची सवलत तसेच पुनजरेडणीची संधी मिळणार आहे.

सर्व संधी देऊनही वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करावा लागतो. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसूल होईल व ग्राहकांना लाभ मिळेल, या हेतूने ही योजना जाहीर केली आहे. १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ हा या योजनेचा कालावधी आहे. कृषी ग्राहक वगळता सर्व वर्गवारीतील ग्राहकांना ती लागू असेल. योजनेत थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची  मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येईल.

थकबाकीदार ग्राहकांनी मुदलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळेल. ग्राहकांना रक्कम सुलभ हप्तय़ाने भरावयाची असल्यास मुदलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. यानंतरच त्यांना उर्वरित रक्कम सहा हप्तय़ांत भरता येईल. लाभार्थी ग्राहकाने उर्वरित हप्तय़ांची रक्कम भरली नाही तर माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होईल. महावितरणने थकबाकीच्या रक्कम वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल केला असेल आणि ग्राहकांना वरील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा ग्राहकांना महावितरणला दाव्याचा खर्च द्यावा लागणार आहे.

ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजपुरवठा सध्या आहे त्याच ठिकाणी तो पुन्हा सुरू करायचा झाल्यास महावितरण वीजपुरवठा सुरू करेल, परंतु ग्राहकाला नवीन वीजजोडणी घ्यावयाची असल्यास नियमानुसार पुनर्वीजजोडणी शुल्क व अनामत रक्कम भरावी लागेल. ज्या ग्राहकाला हप्तय़ाने थकीत रक्कम भरावयाची असेल अशा ग्राहकाने वीजजोडणी चालू केल्यावर चालू देयकाच्या रकमेसोबत ठरवून दिलेल्या हप्तय़ाची रक्कम भरणे अनिवार्य असेल. ज्या ठिकाणी महावितरणच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिलेला असेल व १२ वर्षांच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकाने कोठेही अपील फाइल केले नसेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येईल. ज्या ग्राहकांचा न्यायालयात वाद चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ही योजना फ्रेंचायसीमधील ग्राहकांनासुद्धा लागू असेल.

नाशिकची स्थिती काय?

नाशिक मंडळांतर्गत चांदवड विभागात १० हजार ८१६ ग्राहकांकडे (मूळ थकबाकी सहा कोटी १८ लाख रुपये) आहे. नाशिक ग्रामीण विभागात ३१ हजार २५ ग्राहक (१६ कोटी ६९ लाख), नाशिक शहर एक विभाग १२ हजार ४६९ ग्राहक (आठ कोटी ८६ लाख), नाशिक शहर विभाग २९ हजार ५३१ ग्राहक (१८ कोटी २१ लाख), नाशिक मंडळात ८३ हजार ८४१ ग्राहकांकडे मूळ थकबाकी ४९ कोटी ९५ लाख रुपये असू त्यावर व्याज व दंड सहा कोटी ४० लाख रुपये आहे. मालेगाव मंडळांतर्गत कळवण विभागात १० हजार ५९५ ग्राहकांकडे (मूळ थकबाकी चार कोटी ५६ लाख) आहे. मालेगाव विभागात २० हजार ६०३ ग्राहक (१५ कोटी १२ लाख), मनमाड विभागात १८ हजार ४१ ग्राहक (११ कोटी ४९ लाख), सटाणा विभागात नऊ हजार १४८ ग्राहक (चार कोटी २४ लाख) अशी स्थिती आहे. मालेगाव मंडळात एकूण ५८ हजार ३८७ ग्राहकांकडे मूळ थकबाकी ३५ कोटी ४२ लाख असून त्यातील व्याज व दंड रकमेत पाच कोटी ५१ लाख इतकी सवलत मिळेल.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhay electricity opportunity lakh electricity consumers free arrears through scheme amy

ताज्या बातम्या