लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अबू सालेम याला शनिवारी मनमाड येथून कडेकोट बंदोबस्तात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. सालेम मनमाड रेल्वे स्थानकात येणार असल्याने स्थानकास छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. फलाटवरील आणि रेल्वेतून जा-ये करणाऱ्या प्रवाशांमध्ये बंदोबस्तामुळे उत्सुकता दिसून येत होती.

या बंदोबस्ताचा फटका प्रवाशांसह स्थानिकांनाही बसला. अबू सालेम मनमाड रेल्वे स्थानकावर येणार असल्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. नवी दिल्ली- बंगळुरू- कर्नाटक एक्स्प्रेसने सालेमला नवी दिल्लीहून मनमाड येथे आणण्यात आले आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रस्तामार्गे नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.

आणखी वाचा-नाशिकमध्ये संततधार, चार धरणांमधून विसर्गात वाढ; गंगापूर ७५ टक्क्यांवर

२००२ मध्ये उद्योगपती अदानी यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अबू सालेमवर दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणासह अन्य प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीसाठी त्याला दिल्ली येथे नेण्यात आले होते. अबू सालेम हा आधी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तळोजा येथून नाशिकरोड कारागृहात सध्या ठेवण्यात आले आहे. दिल्लीतील न्यायालयीन सुनावणीसाठी त्याला नाशिकरोडहून दिल्लीला नेण्यात आले होते. शुक्रवारी दिल्ली येथील न्यायालयाचे कामकाज आटोपून बंदोबस्तावरील मोठा लवाजमा सालेमसह मार्गस्थ झाला.

आणखी वाचा-नाशिकमध्ये मविआमध्ये बेबनाव, ठाकरे गटावर शरद पवार गटाची टीका

शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कर्नाटक एक्स्प्रेस मनमाड स्थानकांत फलाट क्रमांक चारवर आल्यानंतर गाडीत आलेल्या दहशतवाद विरोधी केंद्रीय सुरक्षा पथकाने पूर्ण बोगीला वेढा घेतला. ब्लॅक कॅट कमांडोजच्या सुरक्षा रिंगणात सालेम गाडीतून उतरला. फलाट क्रमांक चारवरून तीनवर हा लवाजमा येत असतानाच रेल्वे स्थानकालाही पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जागोजागी सुरक्षा रक्षक तैनात होते. पूर्ण फलाट त्याला नेण्यासाठी मोकळा करण्यात आला. केंद्रीय सुरक्षा पथक, ब्लॅक कॅट कमांडोज्, शीघ्र कृती दल, सुरक्षा यंत्रणेचे वरीष्ठ अधिकारी असा मोठा लवाजमा पाहून नागरिकही धास्तावले होते.

स्थानकाच्या पलीकडच्या बाजूला लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर पोलिसांच्या वाहनातून बंदोबस्तात सालेमला नाशिक कारागृहासाठी रवाना करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu salem sent to nashik under tight security from manmad railway station mrj
Show comments