नाशिक : गोदावरीला काँक्रीटीकरणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी रखडलेल्या कामास गती देऊन सर्व कुंडातील १७ नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्यास चालना देण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीपात्रात न सोडता थेट वाहिनीद्वारे उद्योग किंवा शेतीला देण्याबाबत महापालिका धोरण निश्चित करणार आहे.
गोदावरी प्रदूषणाच्या विषयावर बुधवारी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, मनपा आयुक्त रमेश पवार, स्मार्ट सिटी कंपनीचे सुमंत मोरे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अभिनेता चिन्मय उदगिरकर, राजेश पंडित, देवांग जानी, प्राजक्ता बस्ते यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोदा पात्रातील काँक्रीटीकरण काढण्याचे काम थांबल्याकडे जानी यांनी लक्ष वेधले. पात्रातील १७ कुंड पुनरुज्जीवित करण्याचे निश्चित झालेले आहे. पहिल्या टप्प्यात पाचपैकी केवळ अनामिक आणि दशाश्वमेघ कुंडांचे काम झाले. उर्वरित रामगया, खंडोबा आणि पेशवे कुंडाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे अन्य १२ कुंडांचेही काम रखडले.
कुणाची लेखी हरकत नसताना हे काम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पालिका आयुक्तांनी त्यास आता विलंब करू नका, असे सूचित केले. गोदावरीचे प्रदूषण कमी करून तिचे पावित्र्य जपण्यास आपण प्राधान्य दिले आहे. शक्य तितक्या लवकर उर्वरित कुंडांचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
शहरातील काही गटारींच्या वाहिन्या पात्रालगत म्हणजे पूररेषेत आहेत. २००८ आधी गोदावरीसह उपनद्यांच्या पूररेषा अस्तित्वात नव्हत्या. तेव्हा ही कामे झाली असल्याने पूररेषेतील बांधकामांचा विषय ऐरणीवर आल्याचा मुद्दा मनपा अधिकाऱ्यांनी मांडला. चर्चेत पात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर चर्चा झाली.
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्रांच्या कामाची माहिती देण्यात आली. प्रक्रियेशिवाय सांडपाणी नदीपात्रात न सोडणे अपेक्षित आहे. प्रक्रियायुक्त सांडपाणी पाटबंधारे विभाग एकलहरे वीज केंद्राला देते, असे पंडित यांनी नमूद केले. प्रक्रियायुक्त पाणी देखील पात्रात सोडले न गेल्यास प्रदूषणाची पातळी कमी करता येईल. प्रक्रिया केलेले पाणी थेट जलवाहिनीद्वारे उद्योग, शेतीला देण्याबाबत महापालिका धोरण निश्चित करेल, असे आयुक्त पवार यांनी नमूद केले.
गोदावरी टिकली तर जीवसृष्टी टिकणार आहे. नाशिककरांनी तिच्याकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. बैठकीत अतिशय चांगली चर्चा झाली. गोदावरीचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने नवीन दिशा व प्रयत्न होत आहेत.-डॉ. राजेंद्र सिंह (जलतज्ज्ञ)