भुताळीण म्हणून महिलेला कुटूंबासह घर सोडण्याची वेळ आणणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोरवाडी पाड्यात सोमवारी विपरीतच झाले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे गैरसमज दूर करुन थेट भुताळीण ठरविलेल्या महिलेने तयार केलेले अन्न खाल्ले. या प्रकाराने डोळे उघडलेल्या पाड्यावरील इतर महिलांनी आणि भुताळीण ठरविल्या गेलेल्या महिलेने एकमेकींना साखर भरवित तोंड गोड केले. यापुढे गुणागोविंदाने राहण्याचे अंनिसला आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “आपण बाळासाहेबांच्या काँग्रेसचे काम करायचे, की नानांच्या काँग्रेसचे?”, पक्ष प्रवक्त्याचं ट्वीट चर्चेत

भोरवाडी पाड्यावरील एका महिलेला गावातीलच काही महिलांसह पुरुषांनी भुताळीण ठरवित तिला आणि तिच्या कुटूंबातील सदस्यांना वारंवार दुषणे देण्यात येऊ लागल्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले. भुताटकी, मंत्रतंत्र, करणी ,भानामती,जादूटोणा अशा अवैज्ञानिक गोष्टींवर आजही समाजात अंधश्रध्दा दृढ असल्याने या महिलांमध्ये आपापसात सातत्याने भांडणे होऊ लागली. त्यामुळे संबधित कुटूंबास गावात राहणे अशक्य झाले. दररोजच्या दुषणांना वैतागून संबंधित कुटूंबासह तिच्या नातेवाईकांनी रहाते घर सोडले. या प्रकाराची माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूनल समितीच्या नाशिक येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी भोरवाडी पाड्यावर भेट देण्याचे ठरविले.

हेही वाचा- “तुम्ही लिहून घ्या, आता मंत्रीमंडळ…”, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल!

त्यानुसार प्रारंभी घोटी पोलीस ठाण्यात जाऊन अंनिसच्या वतीने संबंधित महिलेला न्याय मिळावा, सर्वांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली. पोलीस अधिकारी दिलीप खेडेकर यांनी तातडीने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पोलीस कर्मचारी दिले. त्यांच्यासह कार्यकर्ते भोरवाडी पाड्यावर पोहचले. दोन्ही बाजूच्या महिला आणि पुरुषांना एकत्र आणून त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. केवळ भुताळीण ठरवून, त्यातून गैरसमज झाल्याचे उघड झाले. भुताळीण ठरविलेल्या महिलेला मंत्र, तंत्र, जादूटोणा येत असेल आणि त्यातून जर वाईट घडत असेल, असा जर ग्रामस्थांचा समज असेल तर संबंधित महिलेच्या हातून काही खाल्ल्यास आमच्यावरही परिणाम होईल की नाही, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या डोळ्यांवर असलेले अंधश्रध्देचे झापड दूर करण्यासाठी भुताळीण ठरविलेल्या महिलेने केलेला स्वयंपाक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खाल्ला. त्यांनी इतर ग्रामस्थांनाही जेवण करण्याचे आवाहन केले. इतरांनीही ते अन्न आणि पाणी घेतले.

हेही वाचा- पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला केंद्राची मान्यता

यानंतर पदाधिकाऱ्यांनी अंधश्रध्दा आणि त्यांचे निर्मूलन याबद्दलचे शास्त्रीय विवेचन करून उपस्थितांच्या मनातील अंधश्रद्धांची जळमटे दूर केली. ज्या महिलेला भुताळीण ठरविण्यात आले होते आणि ज्यांनी तिला भुताळीण ठरविले होते, अशा दोन्ही बाजूकडील महिलांना एकत्र आणले. पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार त्यांनी एकमेकींच्या तोंडात साखर भरून तोंड गोड केले. यापुढे आम्ही प्रेमाने एकत्र राहू, कुणाला भुताळीण ठरविणार नाही, दोष देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. अशा प्रकारे अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी एका महिलेचे जीवन वाचविले. या मोहिमेत महाराष्ट्र अंनिसचे मुख्य सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे ,नाशिक शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे, सचिन महिरे, पोलीस हवालदार बी. आर. जगताप यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा- नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

प्रकरण काय ?

भोरवाडी परिसरातील कुटूंबातील एका महिलेवर भुताटकी करत असल्याचा आरोप करण्यात आला. कुटूंबातील लोकांनाही दुषणे देण्यात येत होती. दुषणे देणाऱ्यांपैकी एका कुटूंबातील बालकाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. यावरून हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. या प्रकारामुळे गावातील लोकांनी अन्य ठिकाणी जाऊन बुवा, भगत यांची मदत घेण्यास सुरूवात केली. गाणगापूर येथे एका गुरूजीची भेट घेतली असता गावातील लग्न झालेल्या तसेच लग्न करून अन्य गावी गेलेल्या मुलींना घेऊन या. त्यातून कोण भूतबाधा करत आहे, कोणाच्या अंगात भुताळीण आहे, हे कळेल असे सांगितल्यावर गावातील काही लोकांनी एकत्र येत गाणगापूरला महिलांना नेण्यासाठी वाहनही ठरविले होते, अशी चर्चा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acceptance of the woman who was determined to be ghostly by the village dpj
First published on: 06-02-2023 at 18:22 IST