• महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर 
  • आमदार देवयानी फरांदे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : शहरात सध्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. खड्डे योग्य प्रकारे भरले न गेल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत आमदार फरांदे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे.

शहरात पावसाळ्यात रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले असून ते भरण्याचे काम महानगरपालिकेच्या ठेकेदारामार्फत केले जात आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे खड्ड्यातील मुरूम रस्त्यावर  पसरून अपघात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ठेकेदार आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात संगनमताने हे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून या कामांचा उद्देश केवळ ठेकेदाराचा आर्थिक फायदा करून देणे आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: पाहणी करावी, कामाच्या दर्जाबाबत चौकशी केली जावी. चौकशीअंती दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. जोपर्यंत आयुक्तांकडून कामाची पाहणी होत नाही, तोपर्यंत ठेकेदारांना देयक देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नाशिककरांच्या हितासाठी आमच्या सोबत या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे फरांदे यांना आवाहन

नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी तक्रार केल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना नाशिककरांच्या हितासाठी आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करून काहीही निष्पन्न होणार नसून दत्तक नाशिकच्या हिताकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोबत रस्त्यावर उतरून आक्रमक होण्याचा सल्ला पत्राव्दारे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आमदार फरांदे यांना दिला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामांसंदर्भात आपण नाशिक महानगरपालिका आयुक्ताना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. परंतु नाशिककरांनी कर स्वरुपात भरलेल्या पैशांची नासाडी होऊन ठेकेदारांचा आर्थिक लाभ होत असताना आपण तात्पुरत्या स्वरुपाची चौकशीची मागणी करत आहात. महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करून काहीही उघड होणार नसल्याने नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.