नाशिक – शहर पोलिसांच्या वतीने शनिवार आणि रविवारी शहर आयुक्तालय हद्दीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत १८ मद्यपींवर कारवाई करण्यात आली असून एक लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावण सुरु होण्याआधीच्या शेवटच्या दिवशी मद्यपी आणि मांसाहारी चंगळ करतात. याच दिवशी दीप अमावास्याही असते. मद्यसेवन करुन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण या दिवशी अधिक असते. यंदा हा दिवस नेमका रविवारी आल्याने अशा मंडळींना आयतीच सुट्टी मिळाली. मद्यपी वाहनचालकांमुळे होणारे धोके लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा वाहनधारकांविरुध्द मोहीम हाती घेतील. वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तीन आणि चार ऑगस्ट रोजी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आली. वाहतूक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, उपआयुक्त मोनिका राऊत यांनी मोहिमेची पाहणी केली.

हेही वाचा >>>मालेगावजवळ पोल्ट्रीत बिबट्या शिरला अन्…

या मोहिमेतंर्गत १८ मद्यपी वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुध्द नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करुन प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. तसेच वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला. यापुढेही अशी मोहीम सुरु ठेवण्यात येणार असल्याचा इशारा सुरडकर यांनी दिला. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against 18 drunk and drivers in the nashik city amy
Show comments