scorecardresearch

नाशिक : अल्पवयीन मुलांना गुटखा विकणाऱ्या टपरी चालकांविरुद्ध कारवाई

आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १५ टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

shops selling gutkha nashik
अल्पवयीन मुलांना गुटखा विकणाऱ्या टपरी चालकांविरुद्ध कारवाई (छायाचित्र – प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

अल्पवयीन मुलांना गुटखा, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपरी चालकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १५ टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या विळख्यात सापडली असताना अल्पवयीन मुलेही त्यात ओढली जात आहेत. ग्रामीण पोलिसांनी या विरोधात ठोस पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असतांनाही नियमांचे उल्लंघन होत असून टपरी चालक नियमांना हरताळ फासत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. ग्रामीण पोलिसांनी याविरोधात कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा – कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”

जिल्ह्यातील विशेष पोलीस पथकांनी सिन्नर औद्योगिक वसाहत परिसर, पवारवाडी, चांदवड, आयेशानगर, त्र्यंबकेश्वर, रमजानपुरा, लासलगाव, सायखेडा आणि जायखेडा येथील शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसरातील टपरी चालकांवर कारवाई केली. यामध्ये १५ टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा – भुसावळच्या रस्त्यांवर चार्ली चॅप्लीन ;शहरवासियांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती

शासनाने १८ वर्षाखालील बालकांना तंबाखू किंवा तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई केली असतांना संशयित विक्री करत होते. यातील काही गुन्हे हे अजामीनपात्र असून १० वर्षांपर्यंत शिक्षा असे स्वरूप आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिक, टपरीचालक आणि इतर आस्थापना धारकांनी प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा व इतर प्रतिबंधित पदार्थांच्या व्यवसायापासून स्वत:ला दूर ठेवावे. याविषयी नागरिकांना माहिती द्यायची असेल तर ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 18:16 IST
ताज्या बातम्या