मालेगाव – मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक वेगवेगळे मार्ग अनुसरत आहेत. काही ठिकाणी पैसे देत मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्याही तक्रारी आहेत. अशा प्रकारांची मालेगाव मध्य मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी गंभीर दखल घेत असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील निहाल नगरात गुलाबी रंगाचे कपडे घातलेल्या एका महिलेला एक व्यक्ती प्रचार पत्रक देत असतानाच रोख स्वरुपात पैशांचे प्रलोभन दाखवित विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका चित्रफितीतून उघड झाले होते. पोलिसांनी त्याची दखल घेत संबंधित व्यक्तीचा तपास केला. निहाल हाजी मोहम्मद सुलेमान (सुलेमान नगर) असे संशयित व्यक्तीचे नाव असल्याचे उघड झाल्यावर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर

निवडणूक दरम्यान एखाद्या व्यक्तीला निवडणूकविषयक हक्क वापरण्यास प्रवृत्त करण्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही व्यक्ती रोख किंवा कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देते किंवा एखादी व्यक्ती असे प्रलोभन स्वीकारत असल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेस अशा व्यक्ती पात्र ठरतात, असे सदगीर यांनी नमूद केले आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून अशाप्रकारे मतदारांना प्रलोभन, लाच अथवा धमकी देण्याचा प्रयत्न होत असेल तर नागरिकांनी त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याचे भरारी पथक, १९५० हा टोल फ्री क्रमांक किंवा ०२५५४-२५३३२० या दूरध्वनीवर द्यावी, असे आवाहन सदगीर यांनी केले आहे.

Story img Loader