कडेकोट बंदोबस्तात शांततेत कारवाई; वाहतुकीचा खोळंबा

अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कोणाच्याही विरोधाला न जुमानता सुरू ठेवली. या वेळी अनधिकृत धार्मिक स्थळांबरोबर गुन्हेगारांच्या नातेवाईकांची काही अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली. कडेकोट बंदोबस्तात शांततेत कारवाई पार पडली. त्यासाठी काही तासांसाठी पोलीस आयुक्त कार्यालय ते अशोक स्तंभदरम्यानची एकेरी वाहतूक बंद ठेवली गेली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

नवीन नाशिकनंतर सातपूर, गंगापूर रोड भागात अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस फौजफाटय़ात नाशिक पश्चिम विभागातील अनधिकृत मंदिरांवर कारवाईला सुरुवात केली. शरणपूर रस्त्यावरील कुलकर्णी गार्डनजवळील गणपती मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले.  नंतर हा जथा गंगापूर रस्त्यावरील पशू वैद्यकीय दवाखान्याजवळ धडकला. रस्त्यावर हजरत गैबनशाहवली बाबा दर्गा आहे. मल्हार खाणीलगतचे अतिक्रमण काढताना गंगापूर रस्त्यावर काही टप्प्यात एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात आली. दोन ते अडीच तासात अनधिकृत धार्मिक स्थळ काढण्यात आले. या स्थळालगतची पान टपरीही हटविण्यात आली. रस्त्याच्या एका बाजूला जेसीबी, बुलडोझर, अतिक्रमण पथक तसेच पोलिसांची वाहने, अतिक्रमण काढताना पाहणाऱ्यांची गर्दी यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. काहींनी पर्यायी मार्गाने निघून जाणे पसंत केले.

ही कारवाई झाल्यावर पथकाने रविवार पेठेतील गणपती मंदिर, घनकर गल्लीतील साईबाबा मंदिराचे अतिक्रमण काढले. याच परिसरातील तुळजाभवानी मंदिरातील वाढीव पायऱ्या काढण्यात आल्या. रेडक्रॉस सिग्नलवरील शितलादेवी मंदिर, पिंपळाच्या पारावर असलेले छोटे शिवमंदिर, मारुतीचे मंदिर या अनधिकृत मंदिरांकडेही पथक वळले. फूल बाजारातील सप्तशृंगी मंदिर काढण्यात आले.

मुंबई नाका परिसरातील कालिकानगर झोपडपट्टी परिसरातील म्हसोबा, हनुमान मंदिर, कालिका मंदिरासमोरील दत्त मंदिर हटविण्यात आले. गंगापूर रोड परिसरातील म्हसोबा मंदिर, आकाशवाणी टॉवरजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शालिमार चौकातील म्हसोबा, सीबीएस येथील साईबाबा आणि भद्रकालीतील म्हसोबा मंदिराचे अतिक्रमण काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मंदिर हटविले जात असताना अनेक भाविकांना रडू कोसळले.

महिला भाविकांची अवस्था तिच होती. न्यायालयाचा आदेश असल्याने फारसे कोणी पुढे येऊन विरोध केला नाही. या कारवाईसाठी भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर मुंबई नाका पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्थितीवर नजर ठेवून होते.