मालेगाव : नाशिक येथील ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाजन यांचा निषेध तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठिकठिकाणचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे. मालेगावात याच मागणीसाठी मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) महाजन यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच महाजन यांना अटक करावी, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात केलेल्या भाषणात महाजन यांनी संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख हेतुपुरस्सरपणे टाळला असून त्याद्वारे मंत्री महोदय किती जातीयवादी व मनुस्मृतीचे पाईक आहेत,हे सिध्द होते, अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.

महाजन हे आज जे संविधानिक पद भूषवित आहेत व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सन्मान घेत आहेत,ते केवळ देशाच्या सर्वोच्च संविधानामुळेच शक्य झालेले आहे. असे असताना संविधान निर्माण करणाऱ्या महामानवाचा विसर त्यांना कसा पडू शकतो, असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला. ही बाब खटकल्यावर तेथे कर्तव्यावर असलेल्या वन खात्यातील दोन महिला अधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी केवळ एखाद्या व्यक्तीचा उल्लेख राहून गेला असेल,अशी मुजोरीची भाषा वापरली. त्यामुळे अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असणे हे अत्यंत दुर्दैवी आहे,असे आंदोलकांनी नमूद केले आहे. तसेच त्याबद्दल महाजन यांचा निषेध करतानाच त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा व त्यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालप‌ट्टी करण्यात यावी,असा आग्रह आंदोलकांकडून धरण्यात आला.

पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील यशोद, उपाध्यक्ष दादाजी महाले, तसेच दिलीप शेजवळ, नानाभाऊ अहिरे, किरण पगारे, आनंद यशोद, अनिल अहिरे, फकीरा सपकाळ, साईनाथ निकम, आनंद वाघ आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.