नाशिक – सर्व सुविधा मिळाल्या असतानाही ऐनवेळी कार्यक्रमाला उपस्थित न राहणे ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना तोट्यात गेले आहे. नाशिकच्या ज्येष्ठ सेवानिवृत्त महिला डॉक्टरने यासंदर्भात केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मौसमी चॅटर्जी यांना ९ टक्के व्याजासह तीन लाख रुपयांचे मानधन परत करण्याचे आणि मानसिक त्रासामुळे १ लाख २५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. एका प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्रीला अशा प्रकारचा दंड ठोठावण्याचा नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे.
डॉ. अरुणा वानखेडे (७४) या नाशिक येथील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्यांनी नाशिक जिल्हा ग्राहक आयोगात दाखल केलेल्या याचिकेनुसार १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्यातील एका रिसाॅर्टमध्ये डॉ. वानखेडे यांनी त्यांच्या सहकाऱ्याचा स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मध्यस्थामार्फत मौसमी चॅटर्जी यांचे तीन लाख रुपये मानधनही ठरले. त्यानुसार डॉ. वानखेडे यांनी दोन लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे पाठवले. उर्वरित एक लाख रुपये रोख रक्कम गोव्यात पोहोचल्यावर देण्यात येणार होते. मौसमी यांच्यासह सहाय्यकासाठी मुंबई-गोवा विमानाची तिकिटे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
ठरल्यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मौसमी चॅटर्जी गोव्यात पोहोचल्या. विमानतळावर त्यांचे स्वागत करून उर्वरित मानधन देण्यात केले. दरम्यान, डॉ. वानखेडे या दुखापतीमुळे स्वतः स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे तसेच अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करून मौसमी या १८ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाला उपस्थित न राहता मुंबईला परत फिरल्या. मौसमी चॅटर्जी या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने मानधन परत मिळावे यासाठी डाॅ. अरुणा वानखेडे यांनी त्यांच्याशी वारंवर ई-मेलव्दारे संपर्क साधला. परंतु, कोणत्याही सकारात्मक हालचाली होत नसल्याने डाॅ. वानखेडे यांनी ॲड. दीप्ती नाशिककर यांच्यामार्फत नाशिक जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली.
या प्रकरणावरील सुनावणीत नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोळहारकर यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. अभिनेत्रीचा हा वैयक्तिक सेवा करार असल्याचा युक्तिवाद फेटाळण्यात आला. संपूर्ण रक्कम आणि सुविधांचा लाभ मिळाल्यानंतरही कार्यक्रमाला न जाणे ही सेवेतील गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. तक्रारदाराकडून घेण्यात आलेले मानधन नऊ टक्के वार्षिक व्याजासह परत करावे, डॉक्टरांना या प्रकारामुळे झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल एक लाख रुपये भरपाई देण्यात यावी, खटल्याच्या खर्चामुळे २५ हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले.
