नाशिक : पशुधन पदविकाधारकांना ग्रामीण भागात गुरांवर उपचार करण्याची परवानगी देण्यासोबत अन्य मागण्यासाठी पदविकाधारकांनी मंगळवारी सटाणा येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पशुधन पदविकाधारक संघटनेचे प्रमुख कपिल अहिरे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शमर्ा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देणान्या पशुसेवकावर बंदी घालावी, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आला . या प्रस्तावामुळे जिल्हाधिकारी व तहसील कार्यक्षेत्रातील पशुसेवकांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या या भूमिकेमुळे पशुधन पदविकाधारक संतप्त झाले आहेत. पदविकाधारकांनी शिवतीर्थापासून ताहाराबाद रोड या मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

आजवर पशुधन सेवकांनी लसीकरण, बिल्ले टोचणे, पशुगणना, कृत्रिम रेतन, शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सर्व प्राथमिक औषधोपचार करण्याची जबाबदारी सांभाळली. यामुळे शेतकरी, पशुपालकांना घरपोच सेवा प्राप्त होते. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली जाते.

शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील पशुसेवकांनी गेल्या १६ जुलैपासुन कामबंद आंदोलन सुरु केलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातीत पशुपालक व शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पदविकाधारक घरपोच सेवा देऊ  शकत नाही. त्यामुळे जनावरे वाचविण्याकरिता पशुधन पदविकाधारकाना सेवा देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार नानासाहेब बहिरम यांना सादर करण्यात आले. मोर्चात हर्षल पवार, अनिल निकुंभ, संजय निकुंभ, दिनेश पाटील आदी पदविकाधारक सहभागी झाले होते.