scorecardresearch

विभागीय क्रीडा संकुलासाठी २६ कोटींचा अतिरिक्त निधी; विस्तारीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

शहरातील विभागीय क्रीडा संकुलाचे विस्तारीकरण आणि श्रेणीवाढ करण्याच्या अनुषंगाने संकुलाच्या बांधकाम योजनांच्या अनुदान मर्यादेत शासनाने वाढ केली आहे.

नाशिक : शहरातील विभागीय क्रीडा संकुलाचे विस्तारीकरण आणि श्रेणीवाढ करण्याच्या अनुषंगाने संकुलाच्या बांधकाम योजनांच्या अनुदान मर्यादेत शासनाने वाढ केली आहे. विभागीय क्रीडा संकुलावर २४ कोटी रुपये खर्च झाले असून या संकुलाचा विस्तार आणि खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर २६ कोटी रुपयांचा अतिरीक्त निधी मिळणार आहे. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा सुधारीत प्रस्ताव पाठवून प्रलंबित कामे गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विभागीय क्रीडा संकुलासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मार्गदर्शन करताना भुजबळ यांनी क्रीडा संकुलाची कामे जसा निधी उपलब्ध होईल, त्याप्रमाणे तत्काळ करावीत, असे सूचित केले. संकुलाच्या निर्मितीसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होण्यासाठी सचिवांशी चर्चा करण्यात आली. उर्वरित २६ कोटींच्या निधीचा आराखडा लवकरच सादर करावा. तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुले विकसित करतांना हॉकी मैदान, शुटींग रेंज यासारख्या खेळांचाही विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजूची २९ एकर जागा क्रीडा प्रयोजनासाठी राखीव आहे. ही जागा विभागीय क्रीडा संकुलाला अधिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना समन्वयाने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.
कृषिमंत्री दादा भुसे यांनी क्रीडा विभागाने तालुका पातळीवर देखील क्रीडा संकुलाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल, याबाबत नियोजन करावे, असे सूचित केले. तालुका पातळीवर सर्वसुविधायुक्त क्रीडा संकुलांची निर्मिती झाल्यास ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांचा चांगल्या प्रकारे
लाभ घेता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या बैठकीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, उपायुक्त प्रशासन रमेश काळे, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाच्या उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागूल आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Additional fund crore divisional sports complex instructions submitting expansion proposal amy

ताज्या बातम्या