नाशिक – पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी स्वच्छ राहावी, गोदावरीतील पाण्याचा साधू, महंत, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे.  गोदावरी स्वच्छेता विषय तसा कायमच चर्चेत असतो. कुंभमेळ्यानिमित्त या विषयाकडे अधिक गांभिर्याने पाहिले जाणार आहे. कुंभमेळ्यात गोदावरी स्वच्छ नसल्यास देशभरातून येणारे भाविक आणि साधू, महंतांचा रोष ओढावण्याची शक्यता असल्याने  नाशिक महापालिका आणि प्रशासनाने गोदावरी स्वच्छतेसाठी जे जे करता येणे शक्य आहे, ते करण्यास सुरुवात केली आहे. आता गोदावरीतील पानवेली काढण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची चर्चा आहे.

कुंभमेळा आणि गोदावरी यांचे अतूट नाते आहे. कुंभमेळ्यानिमित्त देश, विदेशातून येणारे साधू, महंत, भाविक गोदावरीत डुंबण्यासाठी आतुर असतात. अतिशय पवित्र भावनेने ही सर्व मंडळी गोदावरीत स्नान करतात. त्यामुळे त्यांच्या भावनेला कोणत्याही प्रकारची ठेच पोहोचू नये, यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळेच गोदावरी स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम, उपाययोजना करण्यास प्राधान्य देत आहे.

नाशिक शहर परिसरातील औद्योगिक वसाहती, निवासी वसाहतींमधील सांडपाणी गोदावरीत मिसळत असल्याने नाशिकपासून निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरपर्यंत गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेलींचे जाळे तयार होत असते. या पानवेलींमुळे जलप्रदूषणही होत असते. गोदावरीत सांडपाणी जाऊ नये, यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस देणे, इशारा देणे अशी कार्यवाही कायम केली जाते. परंतु, त्याचा फारसा परिणाम होत नाही. महापालिका क्षेत्रात चोपडा लाॅन्स पूल, रामवाडी या दरम्यान पानवेली गोदापात्रात मोठ्या प्रमाणात कायमच साचलेल्या असतात. महापालिकेने यापूर्वी पानवेली काढण्यासाठी यंत्र विकत घेतले होते. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी पानवेलींपासून काही वस्तू तयार करण्याचा  प्रयोग महिला बचत गटांच्या माध्यमातून करुन पाहिला. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे महिलांना पानवेलीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तो प्रयोगही यशस्वी झाला नाही.

आता सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने पुन्हा एकदा गोदावरी स्वच्छतेचा विषय पुढे आला आहे. नाशिक महापालिका हद्दीबाहेर नाशिक आणि निफाड या तालुक्यातील १५ गावे गोदावरी काठावर आहेत. या गावांमधून गोदावरीत जाणारे सांडपाणी तसेच मलजल रोखण्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून जिल्हा परिषदेने तेथे मलनि:स्सारण प्रकल्प तयार केले. यामुळे तेथे गोदावरीत मलजल, सांडपाणी जाण्याास अटकाव झाला. मात्र, गोदावरीतील पानवेलीची समस्या दूर झाली नाही. पानवेली काढण्यासाठी काय करता येईल, यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने होड्या खरेदीचा ४३ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार गोदावरी काठावरील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येकी एक होडी दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या परिसरातील पानवेली काढाव्या लागतील. होड्यांमध्ये बसून कर्मचारी नदीतील पानवेली काढतील, अशी ही योजना आहे.

नाशिक महापालिकेने यापूर्वी यंत्राव्दारे पानवेली काढण्याचा प्रयोग करुन पाहिला. तो यशस्वी झाला नाही. बऱ्याचवेळा हे यंत्रच पानवेळींमध्ये गुरफटून राहत होते. असे असताना आता जिल्हा परिषदेचा होड्यांचा प्रस्ताव मान्य होणार का आणि तो कितपत यशस्वी होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे.