मालेगाव : माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबियांशी संबंधित महात्मा गांधी विद्यामंदिर या नाशिक जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्थेच्या तब्बल २८ माध्यमिक शाळांवर एकाचवेळी प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. अनियमितता तसेच आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांची एकाचवेळी धडक चौकशी केली होती. या चौकशीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा शिक्षण खात्यातर्फे करण्यात आला आहे.

चौकशीत ठपका काय?

शाळांच्या तपासणीत विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यात मोठी तफावत आढळली,संच मान्यतेसाठी जास्त विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षक पदे मंजूर करून घेण्याचा प्रकार घडला, प्रत्यक्ष उपस्थिती कमी असतानाही कागदोपत्री जास्त उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार योजनेचा निधी अधिक प्रमाणात पदरात पाडून घेतला. यामुळे शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. काही शिक्षक काम एका शाळेत करीत असताना वेतन दुसऱ्या शाळेतून घेत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले. तसेच शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि वार्षिक परीक्षांबाबत व्यवस्थापन उदासीन राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुनावणीनंतर प्रशासक नियुक्तीचे आदेश

या चौकशीनंतर शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर नाशिकच्या उपसंचालक कार्यालयाने या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली. शिक्षण संचालकांनी याप्रकरणी सर्व शाळांची स्वतंत्र सुनावणी घेतली. या सुनावणीत संस्थाचालक,संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. अंतिम सुनावणीनंतर शिक्षण संचालकांनी २८ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश पदभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

कारवाईमागे राजकीय आकस

महात्मा गांधी विद्यामंदिर ही संस्था माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबाच्या अधिपत्याखाली चालवली जाते. संस्थेतर्फे जिल्ह्याभरात विविध महाविद्यालये,माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळा चालवल्या जातात. मराठा विद्या प्रसारक संस्थेनंतर नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची ही मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व माध्यमिक शाळांवर अशाप्रकारे घाऊक पद्धतीने प्रशासक नेमण्याची ही कारवाई हिरे कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. स्वतः प्रशांत हिरे हे आता सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. मात्र त्यांची दोन्ही मुले माजी आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हिरे कुटुंबीय आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्तीसाठी शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली कारवाई राजकीय दबावातून आणि संस्थेवर अन्याय करणारी असल्याचा युक्तिवाद संस्था प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी शिक्षण संचालक यांच्यापूढे झालेल्या सुनावणीदरम्यान केला होता. दरम्यान, शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानंतर संस्थेची बाजू जाणून घेण्यासाठी संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र,प्रतिसाद मिळू शकला नाही.