नाशिक – प्रजासत्ताक दिनाच्या नाशिक येथील शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने सुरु झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हा विषय उचलून धरला आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम पोलीस परेड मैदानात झाला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण झाले. महाजन यांनी आपल्या भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने त्याठिकाणी एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “ ज्यांनी संविधान निर्माण केले, त्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात ?” असा थेट प्रश्न संबंधित महिलेने उपस्थित केल्याने एकच गोंधळ उडाला होता. राज्यात ठिकाठिकाणी महाजन यांचा निषेध करण्यात आला.
गिरीश महाजन यांच्याविरोधात ॲट्राॅसिटी विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. महाजन यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येऊ लागली. अखेर मंत्री महाजन यांनी याप्रकरणी भूमिका मांडून आपल्याकडून अनवधानाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहिले असेल असे नमूद करीत दिलगिरी व्यक्त केली.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात आपण मोठा पुढाकार घेतो. काही टिकाणी नेते येतात, हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला आहे. मी दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब यांचे विचार जपणारा आहे. माझ्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी होत आहे. कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही महाजन यांनी केले. मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का ?, जामनेरमध्ये सर्व समाजाच्या सहकार्यामुळे सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले.
दुसरीकडे, मंत्री महाजन यांचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. सोमवारी नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह इतरांनी जमा होत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटीविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण अजून वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून, इतर समाजाच्या नेत्यांकडूनही महाजन यांचा निषेध करण्यात येत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेणं ही अक्षम्य चूक असून महाजन यांनी राजीनामा द्यावयास हवा, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
