पक्ष बदलण्याची ख्याती असलेले अद्वेय हिरे पुन्हा भाजपमध्ये दाखल

सतत पक्ष बदलण्याबद्दलची ख्याती निर्माण करणारे येथील युवा नेते अद्वय हिरे पुन्हा एकदा भाजपवासी झाले आहेत.

bharatiya janata party

महाविकास आघाडीतील भविष्यातील अडचण ओळखून निर्णय

प्रल्हाद बोरसे

मालेगाव : सतत पक्ष बदलण्याबद्दलची ख्याती निर्माण करणारे येथील युवा नेते अद्वय हिरे पुन्हा एकदा भाजपवासी झाले आहेत. जळगाव येथे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हिरे यांनी भाजपमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भुसेंसारख्या आसामीला हिरे हेच चांगली टक्कर देऊ शकतील, असा भाजप नेत्यांचा दृढ विश्वास दिसतो. उभयतांची परस्पर राजकीय निकड भागविणे हाच हिरेंच्या भाजपवासी होण्याचा अन्वयार्थ समोर येत आहे.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे बघावयास मिळत आहे. आघाडी धर्मामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आजवर ज्यांच्याशी दोन हात केले, त्या शिवसेनेच्या भुसेंचे काम करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर येण्याची स्पष्ट शक्यता दिसत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीत थांबणे हा हिरेंच्या दृष्टीने राजकीय आत्मघात ठरू शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. अखेरीस आमदार गिरीश महाजन आणि आमदार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत ते पुन्हा भाजपात दाखल झाले आहेत. हिरे हे पक्ष सोडून गेले नव्हते, तर तटस्थ होते, अशी सारवासारव यावेळी उभय आमदारांना करावी लागली.

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे येथील हिरे घराणे मूळचे काँग्रेसी. अद्वय हिरे हे या घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी. त्यांचे वडील माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युती सत्तेत आल्यावर काँग्रेसचा त्याग करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. पुढे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. १९९९ मध्ये तत्कालीन दाभाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यावर आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काही काळ त्यांनी जबाबदारी निभावली होती. त्यानंतर २००४ आणि २००९ अशा सलग दोनदा भुसे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

सलग दोनदा झालेला पराभव जिव्हारी लागला म्हणून की काय पण, प्रशांत हिरे हे थोरले पुत्र अपूर्वसह नाशिक येथे स्थायिक झाले. अपूर्व यांनी नाशिकमधूनच राजकारण सुरू केले, तर अद्वय यांनी मालेगावात राहून नेटाने किल्ला लढविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. हे करीत असताना हिरे बंधूंनी राष्ट्रवादीशी असलेली नाळ तोडून काँग्रेसला आपलेसे केले. मात्र या पक्षातही फार काळ काही ते रमले नाहीत.

काही काळ जनराज्य या स्वतंत्र पक्षाचा सवतासुभाही हिरे बंधूंनी उभा केला होता. या माध्यमातून अपूर्व हे प्रारंभी नाशिक महापालिकेत नगरसेवक झाले. नंतर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेचे अपक्ष आमदारही झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक मोदींच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार झाला आणि दोन्ही बंधूंनी भाजपचे कमळ हातात धरले. या निवडणुकीत अद्वय हिरे हे धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. मात्र पक्षाने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिल्यावर नाराज झालेल्या अद्वय यांनी केलेली आदळआपट तेव्हा चर्चेचा विषय झाली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हक्काचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ सोडून त्यांनी भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना नांदगाव मतदार संघात भाजपतर्फे आव्हान देण्यास पसंती दिली. अर्थात त्यात त्यांना यश येऊ शकले नाही, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दुषणे देत हिरे कुटुंबीयांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला आपलेसे केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Advay hiray parties rejoined bjp ysh

Next Story
नाशिकच्या गुंडास धुळ्यात अटक
ताज्या बातम्या