मालेगाव: भाजपचे नेते अद्वय हिरे यांना मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावरुन अपात्र ठरविण्यावरुन सुरू असलेला कायदेशीर आणि राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. शिक्षण मंत्री व शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांची मर्जी सांभाळण्यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे आपल्या विरोधात निकाल देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाब आणत असल्याचा खळबळजनक आरोप हिरे यांनी केला आहे. भाजपच्या मंत्र्यांकडून भाजपच्याच कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचा हा प्रकार असल्याचा सूर लावत त्या विरोधात रावल यांच्या मुंबई येथील निवासस्थानासमोर बुधवारपासून उपोषण करण्याचा इशारा हिरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात हिरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राची प्रत फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पत्रात हिरे यांनी पणन मंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषणाला परवानगी द्यावी,अशी विनंती केली आहे.आपले उपोषण लोकशाही मार्गाने व शांततेत केले जाईल,अशी हमी देखील या पत्रात हिरे यांनी दिली आहे.

​नेमके प्रकरण काय?

सन २०२३ मध्ये मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अद्वय हिरे गटाने सत्ता प्राप्त केली होती. स्वतः हिरे हेच समितीच्या सभापतीपदी आरुढ झाले. दरम्यान,जिल्हा बँक ‘कथित’घोटाळा प्रकरणी हिरे यांना नऊ महिने तुरुंगात जावे लागले. या काळात समितीच्या झालेल्या सलग सात मासिक सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवून जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरवले होते. या निकालाच्या विरोधात हिरे यांनी राज्याच्या पणन संचालकांकडे अपील दाखल केले आहे. पणन संचालकांकडे सुनावणीचे काम पूर्ण झाले असून त्यासंदर्भातील निकाल प्रलंबित आहे.

‘तुरुंगात राहावे लागल्याने समितीचे पद जाऊ नये म्हणून आपण समितीकडे रीतसर रजेचा अर्ज सादर केला होता. मात्र सभेपुढे हा अर्ज सादर न करता अन्य संचालकाने माझ्या वतीने केलेला भलताच अर्ज सभेपुढे सादर केला गेला. त्यामुळे रजा मंजूर होऊ शकली नाही व गैरहजेरीच्या कारणास्तव जिल्हा उपनिबंधकांनी आपल्याला अपात्र करणारा निकालो दिला. या निकालाच्या विरोधात आपण केलेल्या अपीलावर पणन संचालकांनी गुणवत्तेच्या आधारे निकाल दिल्यास आपले पद वाचण्याची शंभर टक्के खात्री आहे. परंतु राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे आपल्या विरोधात निकाल देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. आपले राजकीय विरोधक असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मर्जी सांभाळण्यासाठी रावल यांच्याकडून हा दबाव आणण्यात येत आहे’ असा आरोप हिरे यांनी केला आहे.

भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

​हिरे यांनी पत्रात आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये थेट मंत्र्यांवर प्रहार केला आहे. हिरे यांचे कट्टर राजकीय विरोधक दादा भुसे यांच्या इशाऱ्यानुसार पणन मंत्री जयकुमार रावल हे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. या आरोपामुळे महायुती आणि विशेषतः भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. ​केवळ आरोपांवर न थांबता हिरे यांनी आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ११ मार्च २०२६ पासून पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषणास बसण्याची परवानगी मागितली आहे. जर उपोषणाला परवानगी मिळाली नाही तर,अटकेत जावे लागेल असे नमूद करत न्यायासाठी आपण आता थांबणार नाही,असा इशाराच हिरे यांनी यानिमित्ताने दिला आहे.