१७ मे नंतर देवस्थानकडून पार्वतीमातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वतीमातेच्या मूर्तीवरून साधु-महंत आणि विश्वस्त यांच्यातील वादावर मंगळवारी पडदा पडला. विश्वस्तांमध्ये मूर्ती बदलण्याबाबत दुमत नाही. मात्र काही विश्वस्त केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उठाठेवी करत असल्याचा आरोप करत १७ मे नंतर नवीन पार्वती माता मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येईल असे देवस्थानने म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करतांना गर्भगृहानजीक पार्वतीमातेची मूर्ती आहे. मूर्तीला वाहिल्या जाणारे हळदी-कुंकू तसेच अभिषेकामुळे ती खंडित झाली. ही मूर्ती बदलण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सूतोवाच करताच तुंगार ट्रस्टने पार्वतीमातेची मूर्ती ट्रस्टकडून दिली जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार २५ मार्च रोजी देणगी स्वरूपात मूर्ती प्रशासनाकडे सोपविण्यात आली. दरम्यान, २८ मार्च रोजी देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष न्या. वसुधा जोशी-फाळके यांची मुंबई येथे बदली झाली. नवनिर्वाचित जिल्हा न्यायाधीश प्रकाश चिटणीस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रशिक्षणासाठी रवाना झाले. यामुळे मूर्ती किंवा मंदिर प्रशासनाच्या बैठकीस वेळ मिळाला नाही.  १४ एप्रिल रोजी न्या. चिटणीस यांनी मंदिराचा कारभार हाती घेतल्यानंतर विश्वस्तांची बैठक झाली. यावेळी विश्वस्त ललिता शिंदे उपस्थित होत्या. बैठकीत १६ मे रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त पाहत विधिवत पूजन करून नियोजनाविषयी चर्चा झाली. शिंदे यांच्या उपस्थितीत ही चर्चा होऊनही केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, विश्वस्तांशी चर्चा न करता साधु-महंताना खोटी माहिती देत मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यात आल्याचा आरोप विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी केला. त्यामुळे वाद निर्माण झाले.  या संदर्भात समन्वय समितीत मंदिर प्रशासन, देवस्थान, तुंगार ट्रस्ट यांनी हा मुद्दा अंतर्गत असून साधु-महंताना त्यात लक्ष घालण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली. त्यास आखाडा परिषदेचा विरोध होता.

देवस्थानचे जिल्हाधिकारी, पोलिसांना पत्र

त्र्यंबक देवस्थान स्वायत्त संस्था नसून तिच्यावर शासनाचे नियंत्रण आहे. साधु-महंत मंदिर परिसरात येऊन व्यवस्थापनाची मालमत्ता असलेली मूर्ती ताब्यात घेण्याची भाषा करतात. त्यास विरोध केला तर धमकी दिली जाते. हा कोणता प्रकार, असा प्रश्न करत साधु-महंतांच्या कार्यशैलीबाबत देवस्थानने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे.

अंतर्गत वादाचे बैठकीत पदसाद

त्र्यंबकेश्वर येथील आखाडय़ांमध्येही अंतर्गत वाद आहेत. त्याचे प्रतिबिंब मंगळवारी मंदिर आवारातील बैठकीत उमटले. काही आखाडय़ांनी कुंभमेळा झाल्यानंतर कोणती आखाडा परिषद, असा प्रश्न उपस्थित केला. दोन किंवा तीन आखाडय़ातील साधू एकत्र येतात, त्याला एक विश्वस्त खतपाणी घालतो. या स्थितीत निर्णय घेतला जातो व तो सर्वावर लादला जातो. तो आम्हाला अमान्य असल्याचे साधू-महंतानी सांगत विश्वस्तांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. यावेळी दोन महंतांमध्ये जोरदार वाद झाले. यावेळी ते एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधितांना शांत केले.