नाशिक : उसाला प्रति टन तीन हजार रुपये भाव द्यावा, कृषी पंपाला चोवीस तास वीजपुरवठा करावा, कांद्याला प्रति टन तीन हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांना मुबलक खतपुरवठा करावा, बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी बागलाण तालुक्यातील करंजाड उपबाजार समितीजवळ सोमवारी सकाळी विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने दोन तास आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.

सकाळी दहाच्या सुमारास आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा मार्गाची वाहतूक ठप्प झाली. शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे तालुक्यातील बहुतांश नेते उपस्थित होते. या नेत्यांनी कांदा दर आणि बाजार समितीच्या उपाययोजनांविषयी प्रश्न उपस्थित केले. बाजार समितीत शेतकरी निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शीतगृह, समिती आवारात काँक्रीटीकरण, समितीत येण्यासाठी योग्य रस्त्याची सोय असे प्रश्न मांडले.  या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे, भदाणे, देवळा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष नयन सोनवणे, कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, कळवण तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे आदी उपस्थित होते. विविध प्रश्नांचे निवेदन करंजाड बाजार समितीचे अध्यक्ष कृष्णा भामरे यांना देण्यात आले. भामरे यांनी लवकरात लवकर सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मागण्यांचे निवेदन बागलाण तहसीलचे प्रांत अधिकारी नितीन मेधने, जायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनाही देण्यात आले.

कांद्यासाठी उपाययोजना हवी 

कांदा उत्पादनासाठी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) परिसर अग्रेसर आहे. यंदा कांदा पिकाचे भाव खाली येत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असल्याने आंदोलनात कांदा पिकाच्या भाववाढीबाबत शेतकरी वर्गाच्या भावना अनावर होत्या. पुढील काळात शासनाने कांदा पिकाला चांगला भाव देण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.