नाशिक : शनिवारी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत मे महिन्यात ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ८१ जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत एक कोटी २० लाख २७ हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
बकरी ईद सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात गाय, वळू आणि बैलांची कत्तल करण्यास मनाई आहे. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाय केले जात आहेत.
बकरी ईद सण साजरा करतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यातंर्गत केलेल्या कारवाईत ५७ गुन्हे दाखल असून ८१ संशयितांना अटक करण्यात आली आहे. २६३ प्राण्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यात गस्त, नाकाबंदी तसेच तपासणी नाक्यावर पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.