जळगाव : मनमाड–सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारी एक महत्त्वाची दैनिक गाडी आहे, जी छत्रपती संभाजीनगरसह जालना, नांदेडमार्गे धावते. ही गाडी मनमाडऐवजी भुसावळ स्थानकावरून सोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडे त्यासंदर्भात प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.

मनमाड–सिकंदराबाद (१७०६३/१७०६४) अजिंठा एक्स्प्रेस मनमाड येथून सायंकाळी सहानंतर नियमितपणे सुटणारी गाडी दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची वाहतूक सेवा ठरली आहे. ती केवळ नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा आदी भागातील प्रवाशांसाठी महाराष्ट्र व दक्षिण भारताला जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते. भुसावळ व जळगाव परिसरातून सिकंदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, या प्रवाशांसाठी आठवड्यातून केवळ तीनच दिवस थेट रेल्वेगाडी उपलब्ध असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय उपलब्ध असलेल्या गाड्यांना चाळीसगाव आणि पाचोरा या महत्त्वाच्या जंक्शन स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय वाढते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मनमाडहून सुटणारी अजिंठा एक्स्प्रेस थेट भुसावळ येथून सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आला आहे.

अजिंठा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावरून सुरू झाल्यास जळगावसह भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा तसेच परिसरातील हजारो प्रवाशांना थेट दक्षिण भारतात जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे मनमाड स्थानकावरील ताणही कमी होण्याची शक्यता असून, प्रवाशांचा वेळ व खर्च वाचणार आहे. दरम्यान, या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी प्रवासी व विविध संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी व्यक्त करत आहेत. ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मनमाड येथून सुटणारी मनमाड–सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस मनमाडऐवजी भुसावळ येथून सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक आर. के. यादव यांनीही दोन वर्षांपूर्वी दिली होती.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

मनमाड–सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस दररोज सायंकाळी सात वाजता मनमाडहून निघते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पुन्हा मनमाडला येते. जवळपास १२ तास सदर गाडी मनमाड येथील रेल्वे यार्डात थांबून असते. त्यामुळे या गाडीला भुसावळपर्यंत आणण्यासाठी वेळेची कोणतीही अडचण नाही. याशिवाय भुसावळला गाडीची देखभाल करता येईल, यासाठी रेल्वे मंडळाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक यादव यांनी नमूद केले होते. मात्र, नंतरच्या दोन वर्षांत अजिंठा एक्स्प्रेस भुसावळपर्यंत पोहोचलीच नाही. यासंदर्भात, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या वाणिज्य व्यवस्थापकांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या ताज्या माहितीनुसार, सध्या तरी अजिंठा एक्स्प्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार अशक्य आहे. या गाडीमुळे भुसावळ-मनमाड दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.