जळगाव : माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर राज्यपालांनी त्यास मंजुरी दिली. त्यामुळे कोकाटे यांचा मंत्रिमंडळातील प्रवास अधिकृतरीत्या संपला आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात निर्माण झालेल्या रिक्त जागेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. अनेक आमदारांनी मुंबई तळ ठोकून आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे.
कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मंत्रिमंडळात निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील इच्छुकांमध्ये चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे नावही पुढे आले आहे. पाटील यांना यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी ते मुदत व पुनर्वसन मंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनिल पाटील यांच्या नावाचा मंत्रिपदासाठी पुन्हा विचार झाला नाही. यामुळे ते काहीसे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नाराजीतून त्यांनी मंत्री असताना मिळालेली सुरक्षा व्यवस्था देखील नाकारली होती.
मात्र, कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी पुन्हा एकदा प्रयत्नांना वेग दिल्याचे दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्राला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व कमी असल्याचा मुद्दा तसेच मराठा समाजाचा प्रभावी चेहरा, या निकषांवर आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न पाटील गटाकडून सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल पाटील समर्थकांकडून मुंबईत वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवण्यात आला असून, पक्षासह महायुतीच्या पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मर्यादित असल्याची भावना या भागातील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे कोकाटेंच्या रिक्त जागेवर उत्तर महाराष्ट्रातीलच चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांचे नाव महत्त्वाचे मानले जात आहे.
कोकाटेंच्या रिक्त जागेसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने महायुतीच्या नेतृत्वासमोर निर्णय घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. प्रादेशिक समतोल, सामाजिक समीकरणे, पक्षांतर्गत निष्ठा आणि आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कोकाटेंच्या जागेवर कोणाची वर्णी लागते, याकडे उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कोकाटेंचा राजीनामा मंजूर होताच मुंडे यांनी तातडीने दिल्ली गाठत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुंडे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली असून, पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
