Ajit Pawar Wear Paithani Jacket : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. गेल्याकाही दिवसांपासून अजित पवारांच्या पिंक पॉलिटिक्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महिला मतदारांना आकर्षून घेण्याकरता अजित पवारांकडून सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर केला जातोय. चारचाकी वाहनांपासून ते कपड्यांपर्यंत अजित पवारांच्या आजूबाजूला गुलाबी रंग ठळकपणे दिसतोय. पण आज ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. आज ते येवल्यात बोलत होते.

अजित पवारांनी आज येवला येथे पैठणी विणकरांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो. पण तुमच्या लोकांनी पैठणीचं जॅकेटचं घातलंय. बायको म्हणले लग्नात नाही घातलं अन् आता उतारवयात घातलं कसं घातलं. पोराच्या लग्नाची वेळ आली अन् बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय.

हेही वाचा >> Amol Kolhe : “गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…”, अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका; म्हणाले…

भुजबळांच्या अनुभवाचा नाशिकला फायदा झाला आहे

“येवल्याच्या पैठणीला ऐतिहासिक महत्व आहे. भुजबळांच्या ४०-४५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा फायदा येवला व नाशिकला झाला आहे. विणकर समाजाचे संपूर्ण देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. राज्य सरकारने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणा अंतर्गत पुढील पाच वर्षांत २५,००० कोटींची गुंतवणूक करत, तब्बल ५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच विकासाची राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी मरेपर्यंत सोडणार नाही. आम्ही जनसेवक आहोत, आम्ही मालक नाहीत. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत राहील”, असंही ते पुढे म्हणाले.