नाशिक : शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि पक्षाच्या पडझडीनंतरही दिंडोरी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटास विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्ये यांच्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे कामकाज अतिशय उत्तम असल्याचे प्रशस्तीपत्रक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात गुरुवारी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. ओझर विमानतळावर उतरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिंडोरीत आदिवासी शेतकरी मेळाव्यासाठी मार्गस्थ झाले. लखमापूर-खेडगाव रस्त्यावर मातेरेवाडी येथे कादवा सहकारी साखर कारखाना आहे. पवार यांच्या वाहनांचा ताफा कारखानामार्गे जाणार होता. त्यामुळे त्यांना कारखान्यावर चहा, नाश्ता घेण्याची विनंती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्ये यांनी केली होती. शेट्ये हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याऐवजी शरद पवार गटाबरोबर राहणे पसंत केले. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पराभूत करण्यात शेट्ये यांचे नियोजन महत्वाचे ठरले होते. कधीकाळी बरोबर काम करणाऱ्या शेट्ये यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची विनंती अव्हेरणे पवार यांना अशक्य होते. त्यामुळे गावागावातील सत्कार स्वीकारत ते कादवा कारखान्यावर पोहोचले. हेही वाचा.तोरणमाळ येथे धोकादायक ठिकाणी छायाचित्र काढण्याचा मोह अनावर, अन… चर्चा काय झाली ? कारखान्यातील सभागृहात उभयतांमध्ये कारखान्याची स्थिती, अडचणी यावर चर्चा झाली. त्यात कुठलाही राजकीय विषय नव्हता. सरकारच्या मदतीशिवाय कुठलाही सहकारी साखर कारखाना चालवता येत नाही. उपमुख्यमंत्री अजितदादांना कादवा कारखान्याच्या समस्या आधीपासून माहिती आहेत. पाण्याअभावी ऊसाचे क्षेत्र वाढविण्यात अडचणी येतात. कादवा कारखान्याची सद्यस्थिती दादांसमोर मांडण्यात आल्याचे शेट्ये यांनी सांगितले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, बिगर उत्पादक किती आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला दिलेला भाव व रिकव्हरी काय आहे, आदी माहिती देण्यात आली. ही सर्व माहिती ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कादवाचे कामकाज अतिशय उत्तम असल्याचे नमूद केले. कारखान्याच्या अडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीनंतर अजितदादांचा ताफा दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्राकडे मार्गस्थ झाला. हेही वाचा.अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतील गुलाबी वातावरण, वाहनेही गुलाबी भेटीचे तर्कवितर्क दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उपसभापती नरझरी झिरवळ हेच महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढविली जाणार आहे. श्रीराम शेट्ये यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्ष दुभंगल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटासाठी ती अडचणीची बाब आहे. त्यामुळे कादवा कारखान्यास भेट देऊन विरोधाची धार कमी करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.