जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचा निर्णय तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. शेतकरी रूपातील अजित पवार यांचे महाराष्ट्रातील पहिले स्मारक समितीच्या प्रवेशद्वारावर लवकरच आकारास येणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती सभापती अशोक आधार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य चौथऱ्यावर अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. बैलगाडीवर स्वार असलेल्या शेतकरी वेशातील अजित पवार यांचा मुख्य पुतळा मध्यवर्ती ठिकाणी असेल. पारंपरिक ग्रामीण वेशभूषा, शेतकरी भाव आणि ग्रामीण जीवनाशी निगडित प्रतिकात्मक मांडणी यामुळे त्यांचे हे स्मारक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. मुख्य पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना धान्य कापणारा आणि धान्याची पोती उचलणारा शेतकरी, असे दोन पूरक पुतळे उभारले जाणार आहेत. शेती, कष्ट आणि बाजारपेठ यांचा परस्परसंबंध या माध्यमातून अधोरेखित करण्यात येणार आहे. संपूर्ण स्मारकाची उंची सुमारे १५ फूट असेल.

विकासाच्या नात्याला स्मारकातून उजाळा

अजित पवार यांचे अमळनेर तालुक्याशी विकासाचे नाते घट्ट जुळले होते. विद्यमान आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच माजी नगराध्यक्ष (स्व.) सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून शहरासह तालुक्यातील विविध विकासकामांना पवार यांनी वेळोवेळी गती दिली होती. विशेषतः तापी नदीवरील पाडळसरे धरण प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत निधी व प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.अमळनेर तालुक्यातील पायाभूत सुविधा, सिंचन, बाजारपेठ विकास आणि शेतकरी हिताच्या योजनांमध्ये त्यांनी घेतलेल्या पुढाकाराच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

स्मारक प्रेणास्थान ठरण्याची अपेक्षा

दिवंगत अजित पवार यांचे स्मारक केवळ एका व्यक्तीला श्रद्धांजली नसून शेतकरी, श्रम आणि विकास या मूल्यांना अभिवादन करणारे प्रतीक असेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना या स्मारकातून प्रेरणा व ऊर्जा मिळेल, असा विश्वास सभापती अशोक पाटील आणि इतर संचालकांनी व्यक्त केला आहे. अमळनेर बाजार समितीच्या या उपक्रमामुळे तालुक्यात सकारात्मक वातावरण निर्माण आहे.

बाजार समितीची झेप

आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार स्मिता वाघ, उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी वर्ग, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी यांच्या सहकार्याने अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने अलीकडील काळात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
बाजार समितीला पणन विभागाकडून व्याजाच्या पाच टक्के दराने सहा लाख रुपयांचा बोनस प्राप्त झाला आहे.

या निधीतून मार्च महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात १३६ नवीन व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू असून, त्यातून व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच लेखापाल कार्यालयाची स्वतंत्र इमारत बांधून पूर्ण करण्यात आली आहे. या विकासकामांचे उद्घाटन लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.