नाशिक – दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम कारभारी बोडके ( ६३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना तीव्र धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. विधानसभेत अजितदादांना नाशिकमधून सर्वाधिक बळ मिळाले. त्यामुळे त्यांनी नाशिकला तीन मंत्रिपदे दिली होती. नाशिकमध्ये अजित पवार गटाचे दिंडोरीत नरहरी झिरवळ, येवल्यात छगन भुजबळ, कळवणमध्ये नितीन पवार, निफाड दिलीप बनकर, सिन्नरमध्ये ॲड. माणिकराव कोकाटे, देवळालीत सरोज अहिरे, इगतपुरीत हिरामण खोसकर हे सात आमदार आहेत. नाशिक ग्रामीण मध्येही राष्ट्रवादीचा करिष्मा दिसून आला. अजित पवार यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये आपण पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. काहींना आपल्या भावना अनावर झाल्या. तर काही नि:शब्द झाले.
बुधवारी दिंडोरी येथील ढकांबे येथील सुदाम बोडके एका नातेवाईकांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली. या धक्कादायक बातमीने ते अत्यंत गहिवरले. उपस्थितांशी त्यांनी अजित पवारांबद्दल भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत भरभरून संवाद साधला. कोणाशी फारसे न बोलता ते अस्वस्थ मनःस्थितीत दुचाकीवरून नाशिककडे निघाले. नाशिक येथील मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना अधिक त्रास जाणवू लागला. उपचारासाठी ते स्वतः एका खासगी दवाखान्यात गेले, मात्र दवाखान्यातच त्यांची प्रकृती अधिक खालावली. आणि ते कोसळले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले.
सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने ढकांबे परिसरासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. बोडके यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

