नाशिक : उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना दुसरीकडे आपले क्रीडाप्रेम कायमच जपणारे अजित पवार यांचे अकाली जाणे, क्रीडा क्षेत्रालाही चटका लावणारे ठरले आहे. अजितदादांना खेळाडूंविषयी किती आपुलकी होती, याचे अनेक किस्से आहेत. आपल्या करारी आणि रोखठोक स्वभावानुसार खेळाडूंकडे दुर्लक्ष करणाऱ्या संघटक, मार्गदर्शकांना ते फटाकरत असत. महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष म्हणून अजित पवार हे शेवटपर्यंत जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्याशी नाशिक जिल्ह्यातील खो-खो संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू यांचा अधिक संबंध आला.
राजकारण आणि खेळाचे मैदान वेगवेगळे असले तरी या दोन्ही क्षेत्रात काही गोष्टी समान आहेत. या दोघांमध्ये यशस्वी होण्यासाठी रणनीती तयार करावी लागते. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी डावपेच आखावे लागतात. प्रतिस्पर्ध्याचे बलस्थान कोणते, त्यानुसार कुठे नमते घ्यायचे आणि कुठे आक्रमण करायचे, हे ठरवावे लागते. प्रतिस्पर्धी गोटात असलेली रसद आणि आपल्याकडे असलेली रसद यांचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो. प्रसंगी खिलाडूवृत्तीही दाखवावी लागते.
यासंदर्भात नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे पदाधिकारी मंदार देशमुख यांनी अजितदादांच्या स्वभावाच्या आठवणी सांगितल्या. जून २०१० मध्ये किशोर आणि किशोरी गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस अजितदादांना मुंबईत जाऊन स्पर्धेचे अंदाजपत्रक दिले. अंदाजपत्रकावर नजर टाकल्यानंतर अजितदादांनी मंदार देशमुख यांना, “तुझ्याकडे किती पैसे आहेत, एवढ्या पैशात इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन कसे करशील “, असे प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आपल्या प्रश्नांचे उत्तर स्वतः लगेच देऊन टाकले. याआधी दोन वर्षे सदर स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यामुळे या स्पर्धेचे महत्व त्यांच्या लक्षात आल्याने या स्पर्धेला आर्थिक मदत तर केली.
शिवाय, तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांना ही आपली स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांना मदत केली पाहिजे, असे हक्काने बजावले. त्यानुसार समीर भुजबळ यांनीही मदतीचा हात पुढे केला. राज्याच्या इतिहासातील किशोर गटाची ही अशी पहिली स्पर्धा होती, ज्या स्पर्धेत गटवार साखळीपासून बाद फेरीपर्यंत प्रत्येक विजयासाठी प्रत्येक खेळाडूना रोख रक्कम देण्यात आली. त्यामुळे अजितदादांना सदर स्पर्धेविषयी विशेष आपुलकी होती. मे २०१७ मध्ये किशोर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेबाबत जिल्हा संघटनेचे पदाधिकारी अजितदादांना माहिती देण्यातसाठी गेले. ते उन्हाळ्याचे दिवस होते.
“भर उन्हात स्पर्धा घेत असल्याने छोट्या खेळाडूंना त्रास होईल. याचा विचार करा “, अशी सूचना त्यांनी केली होती. सदर स्पर्धेचे आयोजन हे बंदिस्त तंबूत होणार असल्याने खेळाडूंना उन्हाचा त्रास होणार नाही, हे लक्षात आणून दिल्यानंतर अजितदादांनी समाधान व्यक्त केले होते. खेळाडूंप्रती इतकी संवेदनशीलता असलेली व्यक्ती आपण बघितलेली नसल्याचे देशमुख सांगतात. ज्यांच्याशी बोलून आम्ही आमचे प्रश्न मांडू शकत होतो, तो आमचा हक्काचा आवाज निःशब्द झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

