नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेत आपला धर्म ‘हिंदू’ असा नमूद करावा आणि कोणत्याही षडयंत्रांना आळा घालण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी. देशातील सुमारे २०० जिल्ह्यांमध्ये हिंदुंची लोकसंख्या घटत असून बदलत्या लोकसंख्यात्मक रचनेवर चिंता व्यक्त करीत त्या भागांत अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत साधू-महंतांनी केले. संत समितीचे संस्थापक ब्रह्मलीन संत वामदेवजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर धर्मयात्रा व सभांचे आयोजन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक येथील श्री स्वामी नारायण मंदिर सभागृहात पार पडली. भारतातील २६ राज्यांमधून संत-महंत सहभागी झाले होते. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू अविचल देवाचार्य, मुख्य निर्देशक महंत ग्यानदेव सिंह, महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी (महानिर्वाणी), महामंत्री राजेंद्र दास आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी ज्ञानवापी, राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेशी निगडित समकालीन प्रश्न, धर्मांतर व घरवापसी, २०२७ च्या जनगणनेत हिंदू हितांचे विषय, देशभरातील हिंदू मठ-मंदिरांचे सरकारी अधिग्रहण रोखणे आणि त्यांना स्वातंत्र्य देणे, तीर्थक्षेत्रांचे भौतिक व आध्यात्मिक स्वरूप जतन करणे तसेच धार्मिक क्षेत्रात भोंदूंची घुसखोरी अशा विविध विषयांवर सत्रांमध्ये चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
कुंभमेळ्याच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करीत कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी ज्ञानवापी प्रकरणांवरील न्यायालयीन सुनावण्यांवर चर्चा करून लवकरात लवकर तोडग्यासाठी आवश्यक तयारीवर विचार विनिमय केला. देशात काही राष्ट्रविरोधी शक्ती हिंदू संस्कृती, धर्म व विद्यमान सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना संतांनी व्यक्त केली. हिंदू संस्कृती व मूल्यांचे रक्षण करत अशा विरोधी शक्तींवर कठोर कारवाई करण्याचा संकल्प करण्यात आला. देशभरातील हिंदू मठ-मंदिरांचे सरकारी अधिग्रहण थांबविण्याची आवश्यकता मांडली गेली. जे अधिग्रहित झाले आहेत, ते हिंदू समाजाकडे परत द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तीर्थक्षेत्रांवरील अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, देशातील सर्व तीर्थक्षेत्रांचे भौगोलिक व आध्यात्मिक क्षेत्र निश्चित करावे. भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी ठोस कायदेशीर व्यवस्था करावी. जेणेकरून पुढील पिढ्यांना तीर्थक्षेत्रे सुरक्षितपणे उपलब्ध होतील. धार्मिक क्षेत्रात भोंदू आणि बहुरूपी लोकांच्या वाढत्या घुसखोरीबाबत संतांनी चिंता व्यक्त केली. या बाबतची माहिती संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी दिली.
धर्मांतराबाबत चिंता
देशभरात काही ख्रिश्चन आणि मुस्लिम संघटनांकडून होणाऱ्या धर्मांतराबाबत संतांनी चिंता व्यक्त केली. त्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. धर्मांतरविरोधी कायदा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांचे स्वागत करीत जे लोक पुन्हा आपल्या धर्मात येऊ इच्छितात, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
