नाशिक – अखिल भारतीय ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. नाशिक येथे नऊ ते ११ जानेवारी या कालावधीत २७ वे अखिल भारतीय ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनानिमित्त पुरस्काराची घोषणा संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी केली. फादर फ्रान्सिस कोरिया आणि सुनील आढाव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठी साहित्यविषयक वेगवेगळी संमेलने वर्षभर होत असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही जानेवारीत होणार आहे. याशिवाय जानेवारीतच विद्रोही मराठी साहित्य संमेलनही होणार आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हास्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन घेतले जाते. याशिवाय वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने साहित्य संमेलने घेतली जातात. या संमेलनांमुळे मराठी भाषेतील साहित्यविषयक घडामोडींची जाणीव वाचकांना होते.
नवीन साहित्य, साहित्य क्षेत्रातील बदल, जुन्या कोणत्या साहित्याला आजही वाचकांकडून मागणी कायम आहे, नवसाहित्यात प्रसिध्द असा कोणता प्रकार, नवोदित साहित्यिकांमध्ये लोकप्रिय साहित्यिक, या सर्वाविषयी अशा साहित्य संमेलनांमधून माहिती मिळत असते. मराठी साहित्यात ख्रिस्ती समाजाचेही मोठे योगदान राहिले आहे. ख्रिस्ती साहित्यिकांनी मराठी साहित्य समृध्द केले आहे. त्यामुळेच अखिल भारतीय ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्यिकांना गौरविण्यात येते. नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त काही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
संमेलनातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य भूषण पुरस्कारासाठी पुणे येथील कादंबरीकार सनी पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्यव्रती पुरस्कारासाठी पुणे येथील ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे आणि साहित्य गौरव पुरस्कारासाठी नाशिक येथील मुक्ता टिळक यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांमधील फादर कोरिया हे वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या सुवार्ता मासिकाचे माजी संपादक असून लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. अध्यात्मावरही त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सुनील आढाव हे अनेक वर्षांपासून ख्रिस्ती साहित्य चळवळीत सक्रिय असून ख्रिस्ती साहित्य संमेलनासंबंधित त्यांचे संशोधनपर लेखन प्रसिद्ध झालेले आहे. पाटोळे यांचे सुताराचा पोर येशू आणि मुक्तिदाता मोशे कादंबरी आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, नऊ जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सत्रात डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराने पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचे कवी मार्टिन यांनी सांगितले.
