शुक्रवारी वितरण; अभिनेते शरद पोंक्षे यांची उपस्थिती

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे समाजगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
त्यात वैदिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वेदशास्त्री भालचंद्रशास्त्री गोडसे (बडोदा), कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे (पुणे), वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. मीनाताई बापये (नशिक), समाजसेवेतील योगदानाबद्दल अपर्णाताई रामतीर्थकर (सोलापूर) आणि शैलाताई उघाडे (नाशिक) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित सोहळ्यात सच्चिदानंद सद्गुरू श्रीराम महाराज वडवाह यांच्या हस्ते तर ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश गोखले असतील. संस्थेचे मुखपत्र ‘सन्मार्ग मित्र’चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमानंतर लगेचच षड्ज-पंचम निर्मित ‘स्वतंत्रते भगवती’ हा महाराष्ट्रातील पाच प्रमुख संत, छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वाच्या सुमारे ७०० वर्षांतील कालखंडात राष्ट्रातील मानसिक, सामाजिक जडणघडण उलगडून दाखविणारा निवेदनात्मक व गीतांचा कार्यक्रम होणार असून यामध्ये अभिनेते पोंक्षे व हेमंत बर्वे यांचा सहभाग असणार आहे.