नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात दोन वर्षात बांबुच्या झोळीतून रुग्णांना नेताना दोन ते तीन जणांचा झालेला मृत्यू, गरोदर मातांची झोळीत झालेली प्रसूती आणि पुलाअभावी सुक नदीतून बांबुलन्स मधून रुग्णांसह नातेवाईकांचा धोकादायक प्रवास, यामुळे चर्चेत आलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील वेहगीच्या बारीपाड्याच्या नशिबी असलेला आरोग्य असुविधांचा फेरा कधी संपणार, असा प्रश्न समोर आला आहे. अशातच लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीकडे समस्या सोडविण्यासाठी निधीची अपेक्षा करत असतांना जिल्हा प्रशासनाकडून मात्र याबाबत शासन स्तरावरच पाठपुराव्याची अपेक्षा व्यक्त करतअसल्याने वेहगीच्या बारीपाड्यातील मरणयातना संपविण्यासाठी कोण पुढाकार घेईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुर्गम अतिदुर्गम पाड्या- वाड्याचा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख. नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक गावात रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा देखील अजूनही नाहीत. अशातच या ठिकाणच्या आरोग्य समस्यांमुळे आदिवासी बांधवांना आजही मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. मित्ताली सेठी यांनी साकव संकल्पना हाती घेतली आहे. मात्र ही यंत्रणा रुंद पात्र असणाऱ्या नदीत तोकडी असल्याने दुर्गम भागात रस्ते , भ्रमनध्वनीचे जाळे तरी कसे उभे राहणार ? अक्कलकुवा तालुक्यातील वेहगीचा बारीपाडा हा आता चांगलाच चर्चेत आला आहे. अलिकडेच एका २३ वर्षीय महिलेला गरोदरपणामुळे कळा येवू लागल्याने तिला बांबुच्या झोळीतून नेताना झालेला मृत्यू विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
अर्थात, असा या भागातील हा काही पहिला मृत्यू नाही. दोन ते तीन वर्षात अशाच पद्धतीने या भागात दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांना बांबुची झोळी करुन आणतांना एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. मुळातच वेहगीचा बारीपाडा गाव मुख्य रस्त्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिक खडतर परिस्थितीबरोबर गावापासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुक नदीवर पूल नसल्याने झोळीतून रुग्णाला नेताना नातेवाईकांनाही जीवघेण्या यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या नदीवर पुलासह गावापर्यत रस्ता झाल्यास आरोग्य, दळणवळणाची सोय होऊ शकेल. गावात कोणत्याही प्रकारचे मोबाईल संपर्क जाळे नसल्याने समस्यांमध्ये अधिकच भर पडते.
वेहगी बारीपाड्याच्या समस्या सोडविण्यासाठी निधीची मागणी केली असतानाही जिल्हा नियोजन समिती लक्ष देत नसल्याची तक्रार शिवसेनेचे सत्ताधारी आमदार आमश्या पाडवी यांनी केली आहे. सुक नदीवर ८२ मीटर पुलाची गरज असून त्यासाठी नऊ कोटी रुपये लागणार आहेत. या गावाला जाणाऱ्या रस्त्यात अजून ३० मीटरचे दोन ते तीन साकव करावे लागतील. त्यानंतर गाडीने रुग्णांना नेता येणे शक्य होईल. यासाठी आदिवासी विकास विभागाकडे आराखडा पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. मित्ताली सेठी यांनी दिली.परंतु, नऊ कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीतून देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईल संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय टाॅवर समितीची बैठक झाली. बैठकीत बीएसएनएलने नवीन ३२ मनोरे उभारण्याचे प्रस्तावित केले असून केंद्रांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत जिओ कंपनीकडे प्रस्ताव देत तात्काळ या परिसरात मनोरा उभारुन दोन महिन्यात संपर्काचे जाळे निर्माण होईल, असा आशावाद जिल्हाधिकारी डाॅ. सेठी यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, यंत्रणांची चालढकल अशीच सुरु राहिल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दोन हजार लोकांचे प्राण आणि त्यांच्यासाठी आरोग्य व्यवस्था महत्वाची असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तोपर्यंत गरोदर मातांनी आणि रुग्णांनी आधीच रुग्णालयात दाखल होऊन होणारा त्रास टाळण्याची गरज आहे.
