नाशिक – महाराष्ट्रातील इतर कोणत्याही शहरापेक्षा नाशिकचे हवामान, परिसरातील निसर्गसंपन्न वातावरण कोणालाही भावते. त्यातच मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या गर्दीने गजबजलेल्या आणि सिमेंट काॅंक्रिटच्या जंगलात राहणाऱ्या, दररोज उकाड्याने जीव असह्य होणाऱ्या महानगरातील कोणी नाशिकला एक दिवस जरी आले तरी त्यांना नाशिकमधून निघावेसे वाटत नाही. त्यामुळेच की काय, नाशिकमध्ये आपल्या प्रशासकीय सेवेत काही वर्षांसाठी येणारे अधिकारी निवृत्तीनंतर कायमच्या निवासासाठी नाशिकलाच प्राधान्य देतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार यानेही नाशिकमधील शैक्षणिक संस्थांच्या सुविधा पाहून नेमकी हीच भावना व्यक्त केली.
नाशिकमधील प्रसिध्द अशा एमइटी भुजबळ नॉलेज सिटी येथे भव्य सांस्कृतिक सोहळा ‘एमइटी बीकेसी उत्सव २०२६’शनिवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी ‘विरासत’ या संकल्पनेवर आधारित हा उत्सव पारंपरिक आणि आधुनिक संस्कृतीचा सुंदर संगम ठरला. या सोहळ्याला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विरासत संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार, अभिनेत्री वामिगा गब्बी आणि अभिनेत्री जोया अफरोज यांची विशेष उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे अक्षय कुमार व अभिनेत्री वामिगा गब्बी यांनी क्रेनच्या सहाय्याने गाण्यांवर आपली अदाकारी सादर केली. इतर कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने ऑटो रिक्षामधून प्रेक्षकांमध्ये एन्ट्री घेतली. या अनोख्या आगमनामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. आणि संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला. मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, व्यवस्थापकीय संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी अभिनेत्री वामिगा गब्बी, अभिनेत्री जोया अफरोज यांना पैठणी शाल तसेच पैठणी साडी भेट देत विशेष सन्मान केला. अभिनेते अक्षय कुमार यांनाही भेट देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात “सूर निरागस हो गणपती, मोरया मोरया” या भावपूर्ण गणेश वंदनेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नृत्य-नाट्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री वामिगा गब्बी आणि अभिनेत्री जोया अफरोज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कलेचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना भावी उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मेट भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित विरासत सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार आहे. विद्यार्थ्यांसाठी संस्थेने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ हे अतिशय महत्वाचे असून मेटचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहून येथे ॲडमिशन घ्यावेसे वाटते, अशी भावना अभिनेता अक्षय कुमार यांनी व्यक्त केली. ‘विरासत’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय परंपरा, लोककला, संगीत, नृत्य आणि आधुनिक सादरीकरणांचा देखणा मेळ घालण्यात आला. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा उत्सव केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता विद्यार्थ्यांच्या कला, परंपरा आणि वारश्याचा अभिमान जागवणारा ठरला. यावेळी विद्यार्थी, पालक बांधवांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
