नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकच्या दिशेने येत असून शनिवारी मोर्चा नाशिकजवळ येईल. दुसरीकडे, दिंडोरी येथे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली.
अखिल भारतीय किसान सभा आणि माकप यांच्या वतीने जिल्ह्यात तालुकानिहाय आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा प्रभाव आदिवासी तालुक्यांमध्ये अधिक्याने दिसून आला. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर हे तीन तालुके टंचाईगस्त आहेत. या भागातील पश्चिमवाहिनी नद्या आणि उपनद्यांवर मोठ्या आकाराचे बंधारे बांधून त्यांचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला द्यावे, वनपट्टेधारकांचे क्षेत्र ४० आरपेक्षा कमी असल्याने शासकीय योजनांचे लाभ घेता येत नाहीत. त्यामुळे कब्जे वहिवाटीतील चार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राची मोजणी करून भूखंड मंजूर करावा, त्याचा सातबारा तयार करावा, अपात्र वनदाव्यांची फेरचौकशी करून दावे पात्र करणे, वनपट्टेधारकांच्या कृषिमालाची हमीभावाने खरेदी करणे आदी मागण्यांकडे आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले.
दिंडोरी तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी चौफुली परिसरात ठिय्या दिल्याने वाहतूक खोळंबली. पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहने संथपणे पुढे सरकत आहेत. शनिवारी दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह अन्य भागातुन आदिवासी बांधव नाशिकच्या वेशीवर धडकतील. नाशिकमार्गे मोर्चेकरी मुंबईकडे प्रस्थान करणार असून तीन फेब्रुवारी रोजी मोर्चेकरी मुंबईत धडकतील, असे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत बैठक पार पडली आहे. स्थानिक पातळीरचे प्रश्न येथे सुटतील मात्र राज्यस्तरावरील प्रश्न मुंबईत सोडवले जातील असेही गावीत यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांनी आपल्या सोबत आंदोलनाला लागणारा वेळ लक्षात घेता अन्न, धान्य घेतले आहे. काही वाहने, सरपण आदी सामान घेत मजल दरमजल करत हा मोर्चा पायी नाशिकच्या दिशेने सरकत आहे.
