महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते गेल्या महिन्याभरापासून एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसून येत होते. या पक्षातील नेत्यांमधील राजकीय युद्धांचे वृत्त माध्यमांमध्ये कायम येत राहिले. यंदाच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विविध प्रचार सभांमध्ये पक्ष अध्यक्ष आणि प्रमुख नेते येण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तोंडसुख घेण्याची एकही संधी न सोडणारे नेते नाशिककरांना पहावयास मिळाले. या राजकीय धुळवडीला छेद देत नाशिकमध्ये आज एक अनोखी राजकीय ‘मिसळ’ पहावयास मिळाली.

मंगळवारी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदानाआधी सर्व सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी स्वत:ला प्रचारात झोकून दिले होते. त्यामुळे प्रचार काळातील शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी मतदानानंतरची सकाळ नाशिकमधील विविध पक्षाच्या नेत्यांनी अनोख्या पद्धतीने व्यतीत केली. आज सकाळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन तर्रीदार मिसळवर ताव मारला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सर्व पक्षांमधील नेत्यांना मिसळ पार्टीचे आमंत्रण दिले होते. त्यांच्या या आमंत्रणास मान देऊन भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, पक्षातीलच आमदार आणि पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, मनसेचे अशोक मुर्तडक यांसह अनेक नेते मिसळ पार्टीला हजर होते.

सर्वपक्षीय नेत्यांच्या मिसळ पार्टीवर भाष्य करताना, ‘निवडणुकीत भांडल्यानंतर जसे एकत्र येतात, तसेच नाशिकच्या विकासासाठीही अशाच पद्धतीने एकत्र या,’ अशी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली. तर काही नाशिककरांनी या पार्टीवरच शंका उपस्थित करत ‘निवडणुकीपूर्वी मतांसाठी आधी भांडायचे आणि मतदाराची गरज संपल्यानंतर पार्टी करायची’, असे मत व्यक्त केले. एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नाशिकच्या विकासासाठी भांडा, अशीही प्रतिक्रिया काही नाशिककरांनी दिली आहे.