नाशिक – अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) वार्षिक सर्वसाधारण सभेत पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. के. आर. बूब सभागृहात आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

२०२२-२३ या वर्षात आयमाच्या कार्यकारिणीने विविध ४५ उपक्रम राबविले. आयमाला निर्यात व्यवस्थापन कार्यक्रमातून उत्पन्नाचा कायमस्वरुपी स्रोत निर्माण करून दिला. या कार्यक्रमाची तिसऱ्या तुकडीचा शुभारंभही लवकरच होणार आहे. आयमाची सूत्रे हाती घेताना जी ध्येय उराशी बाळगले होते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आगामी वर्षातही उद्योजकांच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे पांचाळ यांनी सांगितले. माजी अध्यक्ष धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, जे. आर. वाघ, जे. एम. पवार, राजेंद्र अहिरे, एस. एस. बिर्दी यांनी उद्योजकांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – निलंबित पोलीस उपनिरीक्षकच निघाला चोर, स्टेट बँकेतील चोरीप्रकरणी तिघे पोलिसांच्या जाळ्यात

आयमाच्या सातत्यपूर्वक पाठपुराव्यामुळे दुहेरी फायरसेसच्या जाचातून अंबडच्या उद्योजकांची जवळजवळ सुटका झाली आहे. मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. या कार्यकारिणीने २०२२ च्या सुरुवातीला डोंगरे वसतीगृह मैदानावर आयमा इंडेक्स प्रदर्शन भरवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्यासह विविध बैठका घेऊन उद्योजकांचे बहुसंख्य प्रश्न मार्गी लावले. सिंम्बॉयसिसच्या मदतीने निर्यात व्यवस्थापन कार्यक्रम हा अभ्यासक्रम सुरू केला. यामुळे नाशकातील निर्यातदारांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.आयमाने अंबडसह सातपूर, सिन्नर तसेच जिल्ह्यातील उद्योजकांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. अंबड एमआयडीसीसाठी सुरू झालेली स्वतंत्र पोलीस चौकी व १० स्वतंत्र घंटागाड्या याचा उल्लेख करून सदस्यांनी पांचाळ, बूब आणि त्यांच्या संघाचा अभिनंदनाचा मांडलेला ठरावही यावेळी संमत झाला.

हेही वाचा – नाशिक: समृध्दी महामार्गावर अपघातात तीन ठार, तीन जखमी

वार्षिक सर्वसाधारण सभेस आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सचिव योगीता आहेर, खजिनदार राजेंद्र कोठावदे, वरूण तलवार, राधाकृष्ण नाईकवाडे, कार्यकारिणी सदस्य व सभासद उपस्थित होते. सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.