जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संशयित लोकसेवक हे नगाव बुद्रुक येथे कार्यरत आहेत.

रवींद्र देविदास पवार (वय ४८), असे ५० हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तक्रारदाराच्या नातलगाला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नगाव बुद्रुक येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याची दोन स्वतंत्र कामे मंजूर झाली होती. या दोन्ही कामांची एकत्रित अंदाजित किंमत सुमारे १२,००,००० रुपये इतकी होती. ही कामे पूर्ण करून त्यांची बिले मंजूर करून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पवार यांच्याकडून तक्रारदाराकडे एकूण कामाच्या रकमेच्या सुमारे ७ टक्के प्रमाणे ८४,००० रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र तक्रारदाराने आर्थिक अडचणी दर्शविल्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन ५०,००० रुपये देण्याचे ठरविण्यात आले.

तक्रारदाराने ही बाब गांभीर्याने घेत ३० एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर विभागाने प्राथमिक पडताळणी केली असता संशयिताकडून लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नियोजनपूर्वक सापळा रचण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारीच सापळा कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान अमळनेर शहरातील राहत्या घरी तक्रारदाराकडून ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना संशयिताला रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, अंगझडतीही घेण्यात आली. पुढील तपासात आर्थिक व्यवहार, संबंधित कागदपत्रे आणि इतर बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि स्मिता नवघरे यांनी सापळा यशस्वीपणे पार पाडला. तसेच पथकातील इतर कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कर्मचारी व पंच साक्षीदार यांनीही समन्वयाने काम करत कारवाई यशस्वी केली. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध आहे.

व्हाटसॲप क्रमांक ७५८८६६१०६४ तसेच विभागाचे संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in, ऑनलाइन तक्रार सुविधा acbmaharashtra.net आणि अधिकृत ई-मेलद्वारेही तक्रार नोंदवता येते. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन भ्रष्टाचाराविरोधात सहकार्य करावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.