जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहर व तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेदरम्यान गावठी बंदुक तसेच तलवार जप्त करण्यात आली. दारूबंदी, जुगार, वाहतूक नियमभंग, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, वॉरंट बजावणी आणि संशयितांची तपासणी अशा विविध स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
अमळनेरमधील कोम्बिंग ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे ७ अधिकारी आणि ६२ अंमलदार तसेच जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे एक अधिकारी व १० अंमलदार सहभागी झाले होते. शहरातील संवेदनशील भाग, संशयितांची ठिकाणे, हॉटेल्स व लॉजेस येथे एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली.
शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई
कारवाईदरम्यान शस्त्र प्रतिबंधक कायदांतर्गत गावठी बंदुक बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तलवार बाळगणाऱ्या एका व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. दारूबंदी कायद्यांतर्गत ९ गुन्हे नोंदविण्यात आले, तर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ५ कारवाया करण्यात आल्या. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ व्यक्तींवर मुंबई पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली. कोटपा कायद्यांतर्गत ३ आणि भारतीय न्याय संहिता कलम २८५ अंतर्गत ७ प्रकरणेही नोंदविण्यात आली.
११३ सराईतांची चौकशी, २५ हिस्ट्रीशीटर तपासले
दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ११३ इसमांना तपासणीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच २५ हिस्ट्रीशीटरांची पडताळणी करून त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले. याशिवाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ३६ मोटार वाहन कायद्यांतर्गत प्रकरणे दाखल करण्यात आली. एमव्ही ॲक्ट ६६/१९२ अंतर्गत १ कारवाई, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच बनावटी (मोसा) सायलेन्सर वापरणाऱ्या २ वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वॉरंट बजावणी व बेपत्ता महिलांचा शोध
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान बेपत्ता असलेल्या ६ महिलांचा शोध घेण्यात आला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेतील १५ अजामीनपात्र वॉरंट, ६ जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. याशिवाय २१ समन्सची अंमलबजावणी करण्यात आली. अमळनेर शहरातील १६ हॉटेल्स आणि लॉजची तपासणी करण्यात आली. दरम्यान, भारतीय न्याय संहिता कलम १२६ व १२९ अंतर्गत २० संशयित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यापक कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगार व सराईत इसमांमध्ये धाक निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अशा विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
