जळगाव : वायरमन म्हणून कारकीर्दीची सुरुवात करत जनसेवेच्या माध्यमातून गुजरातच्या राजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे कळमसरे (ता. अमळनेर) येथील सुधाकर लोटन चौधरी यांची आता सुरत महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नुकतीच निवड झाली आहे. सामान्य स्तरावरून सुरू झालेल्या त्यांच्या या प्रेरणादायी राजकीय प्रवासाचा जन्मभूमीत गौरव करण्यात आला. माळी पंच मंडळाच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यापूर्वी ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढून आपल्या भूमिपुत्राचे उत्स्फूर्त स्वागत केले.

सुधाकर चौधरी यांनी सुरतमध्ये आपल्या कार्याची सुरुवात वायरमन म्हणून केली. अत्यंत सामान्य स्तरावरून कामाला सुरुवात करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. जनसंपर्क वाढत गेला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ त्यांना जनसेवेच्या क्षेत्रात घेऊन आली.

सुरतेत तीन वेळा नगरसेवक

जनसेवेत सक्रिय झाल्यानंतर चौधरी यांना सुरत महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या कार्यशैलीच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या बळावर सलग तीन पंचवार्षिक नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर त्यांची आता सुरत महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे. वायरमन ते नगरसेवक आणि नगरसेवक ते उपमहापौर हा त्यांचा प्रवास संघर्षातून यश मिळविणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आहे. चौधरी यांच्या सत्कारप्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. माणसाची खरी ओळख त्याच्या पदामुळे नव्हे, तर त्याने केलेल्या प्रामाणिक कार्यामुळे निर्माण होते. कर्मभूमीत प्रामाणिकपणे सेवा बजावताना आपल्या गावाचे नाव लौकिक वाढवणाऱ्या व्यक्तीचा जन्मभूमीत सन्मान होणे ही अभिमानाची बाब असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

सुधाकर चौधरी यांची कळमसरे येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि जल्लोषाच्या वातावरणात ग्रामस्थांनी आपल्या भूमिपुत्राचे स्वागत केले. मिरवणुकीत विविध समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार स्मिता वाघ यांनीही सुधाकर चौधरी यांच्या यशाचे कौतुक केले. कामानिमित्त सुरत येथे गेलेल्या चौधरी यांनी व्यवसाय सांभाळत प्रामाणिकपणे सेवा बजावली आणि तेथील जनतेमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर आता उपमहापौरपदापर्यंत मजल मारली आहे. मराठी माणसाने सुरतसारख्या मोठ्या शहराच्या महानगरपालिकेत उपमहापौरपद मिळविणे ही अभिमानाची बाब असल्याचे खासदार वाघ यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना चौधरी यांनी वायरमन म्हणून सुरू केलेले काम, त्यानंतर जनसेवेच्या क्षेत्रात प्रवेश, सलग तीन टर्म नगरसेवक म्हणून केलेले काम आणि आता उपमहापौरपदापर्यंत झालेली वाटचाल हा प्रवास जनतेच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास डॉ. राजेंद्र महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, जयवंतराव पाटील, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन, माजी उपसरपंच पिंटू राजपूत यांच्यासह सुरत येथील मछिंद्र माळी, नामदेवराव बागुल, नारायण अनारसे, सुनील वाघ, डॉ. किरण पाटील, मनोज माळी, अश्विनभाई, हितेश सोनवणे, भटू माळी, सुनील माळी, संतोष माळी आदी मान्यवर उपस्थित होते. अशोक चौधरी, मुरलीधर चौधरी, बाबूलाल पाटील, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र महाजन, सचिव नथु चौधरी, सुदाम चौधरी, आबा महाजन आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले.