जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील दाम्पत्यासह त्यांच्या दोन चिमुकल्या बालकांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. धरणगाव-अमळनेर दरम्यानच्या सुरत रेल्वे मार्गावरील टाकरखेडा परिसरात चौघे मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, मृताच्या नातेवाईकाकडून कौटुंबिक वादाची तक्रार करण्यात आल्यानंतर त्यास कारणीभूत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मृतांमध्ये सुनील अमृत भिल (२८), त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल (२६) आणि त्यांची मुले राज (७) आणि सनी (४) यांचा समावेश आहे. या घटनेने टाकरखेड्यासह परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील भिल हे पत्नी पार्वती आणि दोन्ही मुलांसह गुरुवारी पहाटे चारनंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच रेल्वे मार्गावरील टाकरखेडा परिसरात त्यांनी जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. पहाटेच्या सुमारास रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून पोलिसांना माहिती
पहाटे सुमारे ४.४० वाजता धरणगाव ते अमळनेरदरम्यान टाकरखेडा परिसरात चौघांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, हवालदार संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागूल आणि राहुल पाटील यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
कौटुंबिक वादाच्या तक्रारीने वेगळे वळण
या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौघांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे. कुटुंबाची परिस्थिती, घरगुती वाद तसेच घटनेपूर्वीची परिस्थिती याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. दरम्यान, मृत सुनील भिल यांच्या बहिणीने अमळनेर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. तक्रारीत टाकरखेडा येथील सीताराम भिल याच्यामुळे सुनील आणि पार्वती यांच्यात सातत्याने वाद होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सीताराम भिल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आरोपांची पोलिसांकडून पडताळणी
तक्रारीत करण्यात आलेले आरोप आणि चौघांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संशयिताची चौकशी सुरू असून कुटुंबीय, नातेवाईक तसेच संबंधित व्यक्तींकडून पोलीस माहिती घेत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. एकाच कुटुंबातील दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. विशेषतः सात आणि चार वर्षांच्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
