नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखाने सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते जमिनीत वा इतरत्र सोडून देत होते. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनाक्रमाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे.

अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूजल प्रदूषणाच्या विषयावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार राहुल ढिकले व सीमा हिरे, संबंधित विभागांचे अधिकारी, निमा आणि आयमा या औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मंत्री महाजन यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलप्रदूषणाची दखल घेतली आहे. आजवर या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रभावित क्षेत्रातील बंद केलेल्या कूपनलिकांचा वापर करू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महाजन यांनी दिला.

अवैधपणे सुरू असलेल्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी. दूषित पाणी जमिनीत सोडून भूजलस्रोत प्रदूषित करणाऱ्या उद्योगांची तपासणी करून अशा प्रकारांना तत्काळ प्रतिबंध घालावा, असे निर्देश त्यांनी दिले. जलप्रदूषण करणाऱ्या अनधिकृत उद्योगांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच, दूषित पाण्याची विल्हेवाट नियमांनुसारच लावली जाते की नाही, याची खात्री करावी. प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. दूषित पाणी नदी-नाल्यांमध्ये मिसळू नये आणि भूजलस्रोतांचे प्रदूषण रोखता यावे, यासाठी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी समन्वयाने काम करावे. भूगर्भातील जलस्रोतांची स्थिती तपासून आवश्यक तांत्रिक उपाययोजना निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था (मेरी) आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची मदत घ्यावी, असे महाजन यांनी सूचित केले.

कर्करोगाचा धोका नाही?

भूजलाच्या नमुन्यात क्रोमियमचे प्रमाण ४५ पीपीएम आढळले. खासगी संस्थेच्या तपासणीत पाण्याच्या नमुन्यात कर्करोगकारक ‘हेक्झाव्हॅलेंट क्रोमियम’चे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा एक हजार पट जास्त असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तज्ज्ञांनी पिवळसर पाण्याची तपासणी केली. या पाण्यामुळे कर्करोग किंवा त्वचेचा कर्करोग होत नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे, असा दाखला मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

प्रक्रिया केंद्र महिनाभरात कार्यान्वित करा

अंबड औद्योगिक वसाहतीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम नऊ वर्षांपासून रखडलेले आहे. सध्या या प्रकल्पाचे काम सुरू असून, तो सप्टेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. हा प्रकल्प महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.