नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या निवासी भागात भूजल प्रदूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भूगर्भातील जल प्रदूषण रोखावे, या मागणीसाठी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल हरित लवादाने मागवला असून प्रभावित भागात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या निवासी भागातील कुपनलिकांमधून पिवळसर पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना त्वचा विकारांना सामोरे जावे लागल्याचे समोर आल्यानंतर परिसरातील सर्व कुपनलिका बंद करण्यात आल्या. या परिसरात महानगरपालिकेने वाढीव क्षमतेच्या नळ जोडण्या आणि टँकरद्वारे टाक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था केली. भूजल नमुन्यात ४५ पीपीएम क्रोमियमचे प्रमाण आढळले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने २७५ हून अधिक कारखान्यांची तपासणी करीत सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणाऱ्या २३ हून अधिक कारखान्यांवर कारवाई केली. यातील १७ कारखाने बंद करण्यात करण्यात आले.

तपासणीत ९० जणांना त्वचारोग

आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर त्वचारोग वा तत्सम त्रास होणाऱ्यांची संख्या ९० च्या आसपास पोहोचली आहे. शनिवारी कामगारांची सुट्टी लक्षात घेऊन या दिवशी पुन्हा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करताच बेकायदेशीरपणे जमिनीत अथवा नैसर्गिक स्त्रोतांमध्ये सोडले जात असल्यामुळे भुगर्भातील पाणी प्रदूषित झाल्याची तक्रार करीत पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, दत्त ढगे, प्रवीण शिलावट व रोशन केदार यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली.

प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आक्षेप

कुपनलिकांमधून घातक रसायनमिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांना दुर्धर आजारांचा धोका निर्माण झाला. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यामुळे हरित त लवादात दाद मागावी लागली, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. भूगर्भातील पाण्याचे नमुने तातडीने तपासून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेणे, यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई, प्रभावित क्षेत्रातील बाधितांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नाशिक जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे.

कुंभमेळ्यावर प्रदूषणाचे सावट ?

एमआयडीसीच्या अंबड आणि सातपूर भागातून कोणतीही प्रक्रिया न केलेले ‘हेक्साव्हॅलेंट क्रोमियम’ युक्त औद्योगिक सांडपाणी जमीन, भूजल आणि गटारांमध्ये सोडले जात आहे. ​हे सांडपाणी शेवटी नंदिनी आणि गोदावरी नद्यांमध्ये मिसळत आहे, ज्यामुळे ‘जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९७४’ चे उल्लंघन होत आहे आणि भूजल वापरणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. गोदावरी नदीवर ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू होणार आहे, आणि पाण्यात सोडल्या जाणाऱ्या या घातक क्रोमियममुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे याचिकेतून लक्ष वेधण्यात आले आहे.