जळगाव: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनि‍करण होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, शरद पवार गटाकडून पक्ष संघटन अधिक भक्कम करण्यासाठी राज्यभरात व्यापक पातळीवर फेरबदल व नव्या नियुक्त्या केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्ष कार्याला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. याशिवाय, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याअनुषंगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही आता महिलांच्या हाती नेतृत्व सोपवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कल्पिता पाटील यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या स्वाक्षरीने त्यांना अधिकृत नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वाने तरुण, अभ्यासू आणि संघर्षशील चेहऱ्याला संधी देत संघटन बळकटीवर भर दिल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होत आहे.

१९ व्या वर्षी सरपंचपदाची धुरा

कल्पिता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात युवती काँग्रेसमधून केली असून, त्या काळापासून पक्षाच्या विचारधारेशी निष्ठावान राहून विविध पदांवर जबाबदारीने काम केले आहे. बूथ पातळीपासून ते तालुका व जिल्हा स्तरावर संघटन उभारणीसाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. जनतेशी थेट संवाद, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत आणि संघटनात्मक शिस्त ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी अत्यंत कमी वयात सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. २०१३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या होत्या.

दावोसमध्ये ग्रामीण नेतृत्वाचे प्रतिनिधीत्व

कल्पिता पाटील यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्राम विकासाला गती दिली. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण सुविधा, महिलांसाठी स्वयंरोजगाराचे उपक्रम तसेच सामाजिक सलोखा जपणारे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम गावासाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. २०१६ मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेसाठी भारतातील अवघ्या पाच व्यक्तींची निवड करण्यात आली होती. या परिषदेत सहभाग मिळणे ही त्यांच्यासाठीच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद बाब मानली जाते. जागतिक व्यासपीठावर भारतातील ग्रामीण नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात पुढे

पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक काम केले आहे. शेतकरी, महिला, युवक, कष्टकरी व दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने, निदर्शने आणि लोकशाही मार्गाने संघर्ष केले आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरून लढण्याची त्यांची भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यांच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी झालेल्या या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी व्यक्त केला आहे.